पालघर : हवेमधील सूक्ष्म रुपातील कार्बनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आपल्या स्वतःची, कुटुंबाची व जगाला वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अन्न, वस्त्र, निवारा व २००० पेक्षा अधिक वस्तूच्या उत्पादनात उपयुक्त करणारा बांबू चे. झाड हे प्राणवायू उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावत असून बांबू लागवडीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील जंगलं हिरवी करावी असे आवाहन कृषी मूल्य आयोग समिती तसेच राज्य सरकारच्या बांबू मिशन चे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पालघर येथे केले.
जिल्ह्यात यंदाच्या वर्षी ८५०० हेक्टर वर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आदिवासी बांधवांमध्ये बांबू लागवडीचे महत्त्व व या विषयी जनजागृती करण्या दृष्टीने रोजगार हमी योजना विभागाच्या सहकार्याने पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बांबू लागवड शेतकरी मेळाव्यांचे आयोजन जिल्ह्यात पुढील चार दिवस करण्यात आले आहे. श्रमजीवी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सातिवली (पालघर) येथे या पहिल्या मेळाव्याचे आयोजन प्रसंगी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार स्नेहा दुबे पंडित, बांबू लागवड येथील तज्ञ संजीव करपे, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बांबूच्या माध्यमातून पृथ्वी वाचवा (सेव अर्थ विथ बांबू) या उपक्रमाला आपण काही दिवसांपूर्वी दिल्ली येथून आरंभ केल्याची माहिती देत पाशा पटेल यांनी लगतच्या मुंबई शहराच्या गरजा पुरवण्यासाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव जगाला वाचवू शकतो असे मत मांडले. भात पिकापेक्षा काही पटीने लाभदायक असणाऱ्या बांबूची लागवड करण्याचे आवश्यक असल्याचे आशा पटेल यांनी प्रतिपादन केले. या लागवडीकडे आदिवासी बांधव वळल्यास या जिल्ह्याला चांगले दिवस येतील असेही त्यांनी सांगितले.
बांबूला चांगला दर मिळावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे सांगत लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी यांनी बांबू बाबत प्रचार व प्रसार करावा असे आवाहन आशा पाटील यांनी केले. बांबू मुळे हवेतील कार्बनचे प्रमाण कमी होत असून दगडी कोळसा इतकेच उष्मांक असणाऱ्या बांबूचा वापर आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होईल असे ते म्हणाले. आगामी काळ हा बायोमासचा असून इथेनॉल निर्मितीमध्ये बायोमास पेक्षा बांबू पासून इथेनॉल उत्पादन अधिक प्रमाणात व किफायतशीर रित्या होत असल्याने दिसून आले आहे अशी त्यांनी माहिती दिली.
बांबू लागवड करण्याच्या या मोहिमेत ग्रामसेवक, कृषी सेवक, तलाठी, गटविकास अधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून एका हेक्टर मध्ये बांबूची ४० हजार रोपांची लागवड करता येणे शक्य असून त्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला चार वर्षात ७.०४ लक्ष रुपये शासन देत असल्याची त्यांनी माहिती दिली. बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला घरपोहच रोप पुरवण्यात येणार असून बांबू पासून विविध उत्पादने करण्यासाठी उद्योग उभारणाऱ्यांसाठी राज्य शासनाने ४३०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याची जाहीर केले आहे असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार स्नेहा दुबे पंडित, विवेक पंडित, तज्ञ संजीव करपे तसेच उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी बांबू लागवडी संदर्भात महत्व व शासकीय योजना यांची माहिती दिली. या मेळाव्यानंतर लागवड करू इच्छिणाऱ्या आदिवासी बांधवांकडून त्या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याकडून मंजुरीच्या दृष्टीने अर्ज भरून घेण्यात आले.
बांबू विद्यापीठ सुरू करणार
बांबू विषयक सखोल अभ्यास व्हावा तसेच बांबू पासून वेगवेगळ्या उत्पादनांना चालना मिळावी व लागवडी संबंध मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील लोदगा या ठिकाणी बांबू विद्यापीठ सुरू करत असल्याचे माहिती पाश पटेल यांनी दिली.