पालघर : दिवाळी खरेदीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून पालघर बोईसरसह जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. बोईसर ही खरेदीसाठी पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. करोनापश्चात होणारी दिवाळी दणक्यात करण्यासाठी यंदा नागरिक सज्ज झाले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी जोरदार गर्दी उसळली आहे. ओस्तवाल आणि चित्रालय मार्केटमध्ये मागील १० दिवसांपासून खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. रोज अर्धा ते एक तास प्रवासी वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.

स्टेशन परिसर, नवापूर नाका, मधुर हॉटेल चौक, टाकी नाका, अरीहंत मार्केट, तारापूर रोड, चित्रालय या भागातील मुख्य रस्स्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यांवर रिक्षा, इको सारखी प्रवासी वाहने आणि दुचाकी-चारचाकी वाहने कुठेही उभी केल्याने बाकीच्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होत आहेत.

पालघर रेल्वे स्थानकापासून माहीम रोडवर कमलापार्क भागापर्यंत तर टेंभोडे मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बोईसर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे.  पालघर आणि बोईसरमध्ये एवढी वाहतूक कोंडी असूनही वाहतूक पोलीस मात्र दिसत नाहीत. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे.

यासंदर्भात नव्याने निर्मिती झालेल्या पालघर वाहतूक शाखेशी संपर्क साधला  असता या शाखेकरिता अजूनही पुरेसे मनुष्यबळ कार्यरत झाले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रत्येक चौकात अतिरिक्त मनुष्यबळ कार्यरत ठेवले आहे, असेही सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे.