बोईसर : बोईसर आणि वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे विस्कळीत झाली. शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास बोईसर ते वाणगाव दरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाला. या बिघाडामुळे मुंबई ते सुरत डाऊन मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या व उपनगरी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊन कामावरून खरी परतणाऱ्या प्रवासांचे मोठे हाल झाले.
पश्चिम रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने बिघाड झालेल्या ओव्हर हेड वायर ची दुरुस्ती केल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास तब्बल तीन तासानंतर डाऊन मार्गावरची रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. यादरम्यान ९३०३३ डहाणू रोड लोकल बोईसर स्थानकात, बांद्रा टर्मिनस भुज कच्छ एक्सप्रेस आणि फ्लाईंग राणी पालघर स्थानकात, ९३०३५ डहाणू रोड लोकल आणि वलसाड पॅसेंजर केळवे स्थानकात, अमृतसर गोल्डन मेल सफाळे स्थानकात, वसई रोड येथे त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस व मुंबई सेंट्रल जयपुर, बोरिवली येथे भावनगर एक्सप्रेस आणि कामन येथे दौंड इंदौर एक्सप्रेस थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.