पालघर जिल्हयातील अवैद्य धंदयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पालघर पोलीस सरसावले आहेत. अंमली पदार्थ विरोधात पालघर पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आलेल्या गुप्त कारवाई दरम्यान गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे सात लाख पाच हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी अधीक्षक पदाचा कारभार सांभाळल्यापासून जिल्ह्यात अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. जिल्हयातील अवैद्य धंदयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करणे, गैरधंद्यांबाबत माहिती मिळताच छापा टाकून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
१३ जून रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून गांजा वाहतुकी बाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने विक्रमगड पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या मदतीने विक्रमगड-जव्हार रोडवरील यशवंतनगर गावाच्या हद्दीत सापळा रचला.
यावेळी जव्हार बाजुकडून आलेली चारचाकी गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यात सतिश लक्ष्मण वाघ (५२), सागर सोमनाथ बलसाने (२९) राहणारे नाशिक यांच्या ताब्यातील गाडीच्या डिक्कीत २,०५,१६० रुपये किमतीचा १०.२५८ किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळला. यावेळी पोलिसांनी गाडीसह गांजा असा एकुण ७,०५,१६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याबाबत विक्रमगड पोलीस ठाणे येथे १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास विक्रमगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, भगवान पाटील, पोलीस हवालदार व अंमलदार पथकाने पार पाडली.
अवैध अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावी. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल तसेच अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन आणि युवकांना नशेपासून दूर ठेवणे हे पालघर पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट आहे. – यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक