कासा : कासा उपजिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक वॉशिंग मशीन गेल्या सात महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रुग्णालयातील बेडशीट, चादरी रुग्णालयातील स्वछता कर्मचाऱ्यांना हाताने धुवाव्या लागतात. हाताने धुतलेल्या बेडशीट, चादरी निर्जंतुक व स्वच्छ धुतल्या जात नसल्याची उपचार घेत असलेल्या रुग्णांची तक्रार आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयात जवळपास पन्नास बेड आहेत. त्यामुळे दररोज पन्नास बेडशीट आणि चादरी स्वच्छ धुऊन निर्जंतुक कराव्या लागतात. या कामासाठी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक अशी वॉशिंग मशीन यंत्रणा उपलब्ध होती.
कोविडकाळात ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करण्यासाठी वॉशिंग मशीन यंत्रणा काढण्यात आली. ती दुसऱ्या ठिकाणी बसवून पुन्हा सुरू करणे आवश्यक होते. परंतु ऑक्सिजन प्लॅन्ट बसवणाऱ्या ठेकेदाराने वॉशिंग मशीन बसवण्याचे काम अर्धवट ठेवले. गेल्या सात महिन्यांपासून ही यंत्रणा पूर्णपणे बंद आहे. कासा परिसरातील सायवन, तलवाडा, तलावली, तवा, गंजाड निकणे तसेच महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होतात. रुग्णांना अस्वच्छ बेडशीट आणि चादरीचा वापर केल्यामुळे रुग्णांना त्रास होऊ शकतो. प्रसूती झालेल्या महिला, नवजात बालके, अपघातग्रस्त रुग्ण यांना तर जीवाणू संसर्ग होण्याची शक्यता असते. तरी लवकरात लवकर सदर कपडे धुण्याची यंत्रणा योग्य ठिकाणी बसवून सुरू करण्याची मागणी रुग्ण करत आहेत.
कासा रुग्णालयातील कपडे धुण्याची वॉशिंग मशीन यंत्रणा लवकरात लवकर योग्य त्या ठिकाणी बसवण्यात येऊन ती सुरू करण्यात येईल. हाताने धुतलेल्या बेडशीट, चादरी रुग्णांना दिल्या जात असल्या तरी त्या स्वच्छ असतात.
-डॉ. राजेश केळकर, सहा. जिल्हा शल्यचिकित्सक