डॉक्टर आणि रुग्ण थेट ऑनलाइन जोडण्यासाठी ‘ई संजीवनी’ योजना

पालघर : नागरिकांना किरकोळ आजार तसेच विविध विकारतज्ज्ञ डॉक्टरांचा  सल्ला घेण्यासाठी आता ई संजीवनी योजना अमलात आली आहे. या योजनेद्वारे घरच्या घरी डॉक्टर व रुग्ण थेट ऑनलाइन जोडले जाणार आहेत. याद्वारे रुग्णांना आरोग्यविषयक मोफत सल्ला मिळणार आहे. त्यामुळे ही योजना यापुढे रुग्णांना वरदान ठरेल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ही ऑनलाइन बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी)  सुरू केली  आहे. दूरदृश्य व आभासी प्रणालीच्या ई- संजीवनी पोर्टल माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधल्यावर उपचारासाठी डॉक्टर त्या रुग्णाला औषधांची यादीही देतात. त्या आधारावर औषध विक्रेत्याकडून औषधदेखील सहज उपलब्ध होत आहे.  ऑनलाइन रुग्णसेवा सकाळी ९.३० ते दुपारी १.३० तसेच दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते.  सेवेसाठी हे पोर्टल  अ‍ॅप  ऑनलाइन उपलब्ध असणार आहे.

संजीवनी अ‍ॅप किंवा पोर्टलवर रुग्णाची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर रुग्णाला टोकण घेणे बंधनकारक आहे. टोकन घेतल्यानंतर रुग्णाला त्याच वेळी सेवा ऑनलाइन दिली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांशी पोर्टलद्वारे संपर्क केल्यानंतर त्यांचे मार्गदर्शन व औषधोपचार दिले जातील. पालघर ग्रामीण रुग्णालय, कासा उपजिल्हा रुग्णालय येथे योजना सुरू करण्यात आली आहे. जे.जे. व केईएम रुग्णालय, मुंबई  यांना पोर्टलमध्ये जोडले आहे.  

डॉ. विजय कालमांडे, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील रुग्णांना तातडीच्या उपचार सल्ल्यासाठी ही प्रभावी योजना आहे. करोना परिस्थितीत ही सेवा खूप उपयोगी आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

डॉ.दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. पालघर