पालघर : खडखड धरण पाणीपुरवठा योजनेच्या कामादरम्यान जव्हारला पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण वहिनीची मोडतोड झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जव्हार नगर परिषद  हद्दीत पाणीटंचाईची  स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना खासगी टँकर मागवावे लागत आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

जव्हार नगर परिषदेच्या आठ प्रभागांमध्ये जय सागर जलाशयातून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा यंत्रणा सदोष असल्याने शहरात पाणी समस्या उद्भवली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.  एकीकडे पाणी समस्या उद्भवत असताना दुसरीकडे दवंडी पिटून पाणीपट्टी भरण्याचा अट्टहास नगरपरिषद करत आहे. नागरिकांना पाणीच मिळत नाही तर पाणीपट्टी का भरायची असा सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. शहरातही महिलांना हांडे घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची स्थिती ओढावल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

जव्हारच्या आठही प्रभागांमध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. नगर परिषदेमार्फत याआधी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र तोही बंद केल्यामुळे नागरिकांना पदरमोड करून खासगी टँकरमार्फत पाणी मागवावे लागते.  उन्हाळा सुरू होत असल्याने पाण्याची मोठी आवश्यकता भासणार आहे. त्यातच कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ाने  शहराची तहान भागेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.  प्रशासन, पदाधिकारी हेही  समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरत आहेत, असे आरोप  केले जात आहेत.

काही प्रभागांमध्ये पाण्याची समस्या जाणवत असली तरी ही समस्या दूर करण्यासाठी नगर परिषद प्रयत्न करीत आहे. पाणी समस्यावर नक्कीच तोडगा काढू.-वैभव आवारे,मुख्याधिकारी, जव्हार नगर परिषद

  शहरात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत  आहे. पाणी समस्या दूर करावी व पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे.-वैभव अभ्यंकर, नगरसेवक, जव्हार नगर परिषद