पालघर: पालघर नगरपरिषद व इतर २६ गावांना प्रादेशिक नळ पुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मासवण येथील मुख्य वाहिनीमध्ये नदीपात्रातील गाळ व कचरा अडकल्यामुळे पालघर शहरातील पाणीपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता. मात्र नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आज दुपारपर्यंत ही वाहिनी पूर्ववत करण्यात आली.
२६ गाव पाणीपुरवठा योजना अंतर्गत पालघर शहरात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे नदीपात्रांची पातळी वाढत असून यासोबत कचरा झाडाच्या फांद्या व गाळ वाहून येत असतो. मासवण येथील मुख्य जलवाहिनीत हा गाळ अडकल्यामुळे सकाळपासून पालघर शहरातील पाणीपुरवठा बंद होता. या कामी पालघर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे व गाळ काढण्याचे काम त्वरित हाती घेऊन चल वाहिनी मार्गातील अडथळे दूर करून दुपारपासून पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे.
पालघर नगरपरिषदचे मासवन पंपिंग स्टेशन येथे सूर्या नदीला पावसामुळे मोठया प्रमाणात गढूळ पाणी येत आहे. त्या पाण्याला फिल्टर हाऊस येथे प्रकिया करून गढूळता कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही प्रमाणात पाणी सुरवातीला गढूळ येत आहे. फिल्टर येथील पाण्याला क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन गॅस देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
पूर्वेकडील नाल्यातील पाईपलाईन होणार काँक्रीट
पालघर पूर्वेकडील घोलविरा भागातील नाल्यामध्ये असलेल्या पाणीपुरवठा वाहून नेणाऱ्या जलवाहिनीत अनेकदा गळतीचे प्रकार सुरू असतात. तसेच नाल्यातील सांडपाणी या गळतीच्या भागातून जलवाहिनीत जात असून त्यामधून या भागात दूषित पाणीपुरवठा होत असतो. याबाबत नगर परिषदेकडे अनेकदा तक्रार केली असता या भागात सुरू असलेल्या काँक्रीटच्या कामा दरम्यान या जलवाहिनीच्या आजूबाजूला काँक्रिटीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र पावसाला सुरुवात झाल्यामुळे काही अडचणी येत आहेत. पाऊस उघडताच या जलवाहिनीला काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाल्यामध्ये असलेली जलवाहिनी वारंवार दुरुस्त करावी लागत असल्याने या जलवाहिनीच्या बाजूला काँक्रीट करण्यात येणार आहे. तसेच पावसाळा दरम्यान नागरिकांनी पाणी गाळून व उकळन प्यावे.- श्रीकांत बगाड, पाणीपुरवठा विभाग अभियंता, नगरपरिषद