अडीच कोटीच्या नावीन्यपूर्ण योजना पाण्यात

नीरज राऊत
पालघर: जिल्हा नियोजन निधीअंतर्गत सर्वसाधारण विकास आराखडय़ामधून जव्हार व मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागात पावसाचे पाणी साठवून, त्याचा उन्हाळ्यात पिण्याच्या कामी वापर करण्यासाठी सन २०१७-१८ मध्ये हाती घेतलेल्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या १६ टाक्यांपैकी अधिकतर टाक्या अजूनही सदोष असल्याने या भागात मुबलक पाऊस पडल्यानंतर देखील या टाक्या कोरडय़ा राहिल्याने परिसर तहानलेला राहिला आहे.

सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून वेगवेगळ्या दुर्गम वस्तीतमध्ये प्री- फॅब्रिकेटेड लोखंडी टाक्यांच्या आवरणामध्ये ताडपत्रीप्रमाणे असलेल्या प्लॅस्टिक पॉलिथिन आवरणात पाणी साठविण्याची  योजना होती. या योजनेअंतर्गत एक लाख लिटरच्या आठ टाक्या, दीड लाख लिटरच्या पाच तर दोन लाख लिटर क्षमतेच्या तीन टाक्या उभारण्यात आल्या होत्या.  या टाक्यांच्या उभारणीत दोष असल्याने काही टाक्या दबल्या तर काही टाक्यांमधील पॉलिथिन अस्तरमध्ये गळती होऊन पाणी वाहून गेले. यासंदर्भात जुलै २०१९ ‘लोकसत्ता’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेने याप्रकरणी चौकशी करून संबंधित ठेकेदाराला गळ्याक्या टाक्या दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. असे असले तरी अनेक टाक्यांची दुरुस्ती व्यवस्थित न झाल्याने या योजनेवर झालेला खर्च पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेला. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.

तीन वर्षांपासून पाडा तहानलेलाच!

मोखाडय़ातील मर्हांडा काकडपाडा येथे १९.२१ लाख रुपये खर्च करून दोन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली. सन २०१९ मध्ये त्याला गळती लागली. त्याच्या दुरुस्तीनंतर २०२० मध्ये या टाकीला पुन्हा गळती लागली. त्याच्या पुन्हा दुरुस्तीनंतरदेखील यंदा पुन्हा या टाकीमध्ये असलेल्या प्लॅस्टिक पॉलिथिन अस्तर फाटल्याने पावसाचे पाणी वाहून गेले. ८० लोकसंख्या असलेल्या दुर्गम पाडय़ावर फेब्रुवारीनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

 फाईल गहाळ ?

नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्री-फॅब्रिकेटेड पाण्याच्या टाक्यांचे काम निकृष्ट असल्याच्या तक्रारीचा पाठपुरावा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे करत होत्या. या संदर्भात कारवाई व सद्यस्थितीबाबत विचारणा केली असता या योजनेचा तपशील असणारी जिल्हा परिषदेमधील फाइलच गहाळ झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.