पालघर : वाडा तालुक्यातील १६ विहिरींची कामे अखेर रद्द केली जाणार आहेत. त्याऐवजी या गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने प्रत्येक घरात नळ पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे यांनी दिली. विहिरीची कामे न केलेल्या ठेकेदाराच्या विरोधात कारवाईचा प्रस्तावही येत्या काळात पाठवला जाणार असल्याचे निवडुंगे यांनी सांगितले आहे.
वाडा तालुक्यातील १६ विहिरींचे काम झाले नसल्याची बाब समोर आली होती. ही सर्व कामे २०१६ ते २०१९ या काळातील आहेत. ठक्कर बाप्पा योजनेतून ही कामे होणार होती. मात्र आदेश असतानाही कामे झाली नाहीत. काही ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हा कार्यालयाने वाडा उपविभागाकडून मागवला होता. उपविभागाने १६ विहिरींची कामे रद्द करून ठेकेदारांवर कारवाई करावी असा अहवाल जिल्हा कार्यालयाला पाठवला होता. मात्र कामे न होण्याची नेमकी कारणे याबाबत स्पष्टता नव्हती. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल कार्यकारी अभियंता निवडुंगे यांनी घेतली असून ही कामे रद्द करण्याची ग्वाही त्यांनी दिली व ठेकेदारांच्या विरोधातील कारवाईचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
तालुक्यात पाणीपुरवठा उपविभाग अंतर्गत विविध गावांमध्ये नागरिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेत आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारच्या ठक्कर बापा योजनेअंतर्गत १३ तर जलयुक्त शिवारअंतर्गत तीन कामांचे आदेश दिले होते. नवीन सार्वजनिक विहीर बांधणे, विहिरीचे नूतनीकरण करणे, आरसीसी विहीर बांधणे अशा कामांचा यामध्ये समावेश होता. एका विहिरीला साधारणत: साडेआठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०१६ पासून या कामांना आदेश दिल्यानंतरही २०२२पर्यंत आजतागायत विहिरींचे काम सुरू झालेले नाही. तर उर्वरित तीन कामे अजूनही अपूर्ण आहेत.
रद्द होणारी कामे
मौजे शेले पैकी हाडळपाडा, मौजे वाघोटे, मौजे शेलटे, मौजे कळंभई गावठाण, मौजे असनस पैकी नाडेबांध, मौजे पोषेरीपैकी दुमडा पाडा, बिलघर पैकी रायात पाडा, वसराळे पैकी जांभूळपाडा,कुयलू पैकी तोरणे िधडेपाडा, विलकोस पैकी घाटाळ पाडा, ढांढर पैकी मोर पाडा, मोज पैकी कातकरी वाडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर बांधणे ही कामे घेण्यात आली होती, तर कुयलू पैकी चेंदवली गावठाण व वसराळे पैकी कडूपाडा व नवापाडा, अंबरभोई पैकी गांद्याचा पाडा ही कामे जलयुक्त शिवारमधील आहेत. ही कामे रद्द होणार आहेत.