Cow vigilante violence Sadabhau Khot भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील गोरक्षकांविरोधात भूमिका घेतल्याने नवीन वाद उफाळून आला आहे. राज्य शासनाचा गोवंश हत्याबंदी कायदा हा तर गोपालक हत्या कायदा बनला आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली असून, सरकारला घरचा आहेर दिला आहे. गोरक्षकांबाबत सदाभाऊ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याच पक्षातून टीकेला सामोरे जावे लागले आहे.
सदाभाऊ खोत हे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्षदेखील आहेत. मुख्य म्हणजे सदाभाऊ खोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले राजकीय गुरू मानतात; मात्र त्याचबरोबर ते शेतकरी नेते शरद जोशी यांना आपले कृषी गुरू मानतात. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद का निर्माण झालाय? ते गोवंश हत्याबंदी कायद्याबद्दल काय म्हणाले? गोरक्षकांनी त्यांच्यावर हल्ला का केला? जाणून घेऊयात.
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
- गोरक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना वाढत असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.
- खोत म्हणाले, “१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात शरद जोशी यांनी ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६’ रद्द करण्याची गरज असल्याबद्दल लिहिले होते. जोशी यांच्या मते, हा कायदा शेती अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक होता आणि त्यात दुरुस्ती करणे आवश्यक होते.”
- खोत सांगतात की, जोशी यांनी शेतकऱ्यांकडे त्यांच्या प्राण्यांविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असावा, असाही युक्तिवाद केला होता.
महिनाभरापासून, महाराष्ट्रातील व्यापारी आणि कुरेशी समाज गोरक्षकांविरोधात आंदोलन करीत आहेत. ‘महाराष्ट्र कुरेशी असोसिएशन’ने सांगितले की, गोरक्षकांमुळे त्यांना त्यांचा व्यवसाय करता येत नाही आणि त्यांची जनावरं अनेकदा जप्त केली जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावर वक्तव्य केले आहे आणि अशा गोरक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. खोतही पहिल्या दिवसापासून कुरेशी समाजाच्या आंदोलनावर बोलत आहेत. कत्तलखाने आणि जनावरांचा व्यापार थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही त्यांचे सांगणे आहे.

कोण आहेत सदाभाऊ खोत?
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील सदाभाऊ खोत हे ३० वर्षांपासून कृषी विषयाशी, विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली ठोस भूमिका मांडत आले आहेत. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन केली, तेव्हा खोत त्यांच्याबरोबर जोडले गेले. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी या संघटनेने साखर कारखान्यांविरोधात आंदोलन केले.
२०१६ मध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सदाभाऊ खोत पहिल्यांदा आमदार झाले आणि फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांना कृषी राज्यमंत्रिपद देण्यात आले. २०१८ मध्ये राजू शेट्टींनी भाजपापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला; पण खोत यांनी भाजपाची साथ सोडली नाही. त्यानंतर त्यांनी ‘रयत क्रांती संघटना’ नावाची आणखी एक शेतकरी संघटना स्थापन केली.
२०२४ मध्ये खोत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. भाजपामध्ये असताना खोत यांच्या गोवंश हत्येच्या बंदीला विरोध करण्याच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच २०१५ मध्ये १९७६ च्या कायद्यात सुधारणा करून गोवंश हत्याबंदी लागू केली होती. खोत म्हणाले, “जनावरांना दररोज ३०० रुपयांचे खाद्य आणि चारा लागतो. एकदा दूध द्यायला लागल्यावर दिवसाला १५ लिटर दूध उत्पादन गृहीत धरले आणि ३० ते ३५ रुपये प्रति लिटरचा किमान भाव मिळाल्यास, त्यातून मिळणारे उत्पन्न दररोज सरासरी ४५० रुपये असते. त्यामुळे, जर एखादा शेतकरी एका जनावरासाठी महिन्याला ९,००० रुपये खर्च करत असेल, तर त्याला त्यातून अंदाजे १३,५०० रुपये मिळतात. त्याचा निव्वळ नफा, ४,५०० रुपये असतो.”
खोत म्हणतात की, जेव्हा जनावरे म्हातारी होतात, तेव्हा शेतकऱ्यांना कोणतेही उत्पन्न मिळत नाही. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत जनावरे विकणे हाच एकमेव उपाय आहे. “शेतकरी जनावराकडे एक ‘मुदत ठेव’ म्हणून पाहतो. जेव्हा ते ही मोठी झालेली जनावरे विकतात, तेव्हा त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो आणि हीच विक्री प्रक्रिया आता या तथाकथित गोरक्षकांमुळे धोक्यात आली आहे,” असे ते म्हणतात.
सदाभाऊ खोत दावा करतात की, देशी गाईंच्या जाती शेतकरी कधीच विकत नाहीत. “अशा जनावरांना शेतकरी त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत सांभाळतात. कारण- ते त्यांना पवित्र मानतात. दूध देणाऱ्या किंवा संकरित जनावरांचाच व्यापार केला जातो,” असे ते सांगतात. गोरक्षकांच्या विरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे भाजपामधून त्यांना केल्या जाणाऱ्या विरोधाबद्दल त्यांना विचारले असता, खोत म्हणतात की, ही टीका अशा लोकांकडून होत आहे, ज्यांनी कधीही गाईचे दूध काढलेले नाही. खोत यांनी असाही दावा केला आहे की, पुणे येथील एका गोशाळेत त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मारहाण झाली, ज्यामुळे त्यांना सोमवारी तक्रार दाखल करावी लागली.