स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कवितेतून टीका केली. कुणाल याने शिंदेंचं नाव न घेता कवितेत ‘गद्दार’ असा उल्लेख केल्याने कार्यकर्ते भडकले. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी खारच्या (मुंबई) युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलधील द हॅबिटॅट या क्लबची तोडफोड केली आहे. या तोडफोडीचं नेतृत्व शिवसेना कार्यकर्ता राहुल कनाल याने केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. याप्रकरणी राहुलसह शिंदे गटाच्या १२ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोण आहे कुणाल कामरा?
३९ वर्षीय राहुल कनाल हा मुंबईतील बांद्रा इथे राहतो. तो २०१० पासून शिवसेनेच्या (उबाठा) युवा शाखेचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय होता. युवा सेनेचा कार्यकर्ता म्हणून राहुलने त्याच्या कारकि‍र्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याची मुंबईतला युवासेनेचा पहिला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२३ मध्ये राहुलने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सेनेचा निरोप घेतला आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून तो शिंदे गटाच्या युवा सेनेचा सरचिटणीस म्हणून काम करतो.

फिल्म इंडस्ट्रीतही नावाजलेला राहुल
वांद्र्यातील एका हॉटेलचा मालक असलेला राहुल याच्या मुंबईत सिनेमा आणि मनोरंजन क्षेत्रातही बऱ्याच ओळखी आहेत. अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटींशी त्याचे जवळचे संबंध आहे. मुंबईत अनेकदा तो सलमान खानसोबत अन्नवाटप करतानाही दिसला आहे. राहुलचा जन्म मुंबईतलाच. ‘आय लव्ह मुंबई’ यासारख्या काही स्वयंसेवी संस्था तो चालवतो आणि अनेक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या कार्यक्रमांमध्ये त्याचा मोठा सहभाग असतो. राहुल हा शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्र्स्टचा विश्वस्तदेखील होता. २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचा तो सदस्यही होता. २०२२ मध्ये राहुलच्या मुंबईतील आस्थापनांवर आयकर विभागाने छापा टाकला होता. शिवसेना नेते यशवंत जाधव यांचा सहभाग असलेल्या कथित हवाला रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला होता.

नितेश राणेंसोबतही वाद
दिवंगत अभिनेता सुशातसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणातही राहुल याचा सहभाग असल्याचा आरोप झाला होता. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत राहुलवर हा आरोप केला होता. त्यानंतर राहुलने ट्विट करत सांगितले की, “सोशल मीडिया हे एक जबाबदार व्यासपीठ आहे, मी कोणाच्याही बेजबाबदार छळापुढे झुकणार नाही. राणेंनी केलेल्या बेताल आरोपांवरून मी त्यांना मानहानीची नोटीस बजावणार आहे”, असे राहुल याने त्यावेळी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोमवारी मुंबई पोलिसांनी राहुल याच्यासह अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलधील द हॅबिटॅट या क्लबची तोडफोड केल्याचा आरोप आहे.