अदाणी समूहाच्या गौतम अदाणी यांचे मोठे भाऊ विनोद अदानी यांची अदाणी समूहाच्या ‘दुष्कृत्यां’मध्ये ‘मध्यवर्ती भूमिका’ होती, असा आरोप काँग्रेसने केला आहे. विविध तपास यंत्रणांचा राजकीय पक्ष, माध्यमे आणि दबावापुढे न झुकणाऱ्या व्यावसायिकांविरोधात मुक्तपणे वापर केला जातो, त्याच तपास यंत्रणा विनोद अदाणींची चौकशी करणार की नाही, असा प्रश्न पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विचारला आहे.
विनोद अदाणी हे अदाणींच्या एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये अब्जावधी डॉलर कर्ज पाठवण्याचे काम करत असत, या व्यवहारांची सेबी आणि ईडीतर्फे चौकशी का नाही, असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या घुसखोरीप्रमाणेच याही मुद्दय़ावर मौन साधले आहे, म्हणून आम्ही प्रश्न विचारायचे थांबणार नाही, असे ट्वीट जयराम रमेश यांनी केले आहे.
काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात येणाऱ्या ‘हम अदानी के है कौन’ या प्रश्नमालिकेचा भाग म्हणून जयराम रमेश यांनी ट्वीट करून प्रश्न विचारले आहेत. विनोद अदाणी हे अदानी समूहाच्या कोणत्याही सूचिबद्ध कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत नाहीत, अशी माहिती अदाणींतर्फे देण्यात आली होती. मात्र ही माहिती चुकीची असल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे.
जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, ‘‘अदाणी समूहाच्या या दाव्यानंतरही या समूहाने वारंवार पब्लिक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली की, विनोद अदाणी या समूहाचा अभिन्न भाग आहेत. २०२०मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल एका दस्तऐवजातही अशी माहिती दिली गेली आहे.” याशिवाय रमेश यांनी प्रश्न केला की, ‘‘तुमचे(पंतप्रधान) मित्र गुंतवणकदारांना आणि जनतेला अशाप्रकारे उघडपणे खोटं का बोलत आहेत?”
हिंडेनबर्ग अहवालानुसार उद्योगपती गौतम अदानी यांचा भ्रष्टाचार बाहेर आला आहे, तरीही त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरत आहेत, असा सवाल अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी शुक्रवारी केला. पंतप्रधान मोदी अदाणींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता.
अदाणी समूहाने अंतर्गत पातळीवर केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे गुंतवणूकदारांना धोक्याची जाणीव होऊन ईएसजी बाजारपेठेत नव्याने चिंता निर्माण झाली आहे. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून गुंतवणूक करणाऱ्या अनेक कंपन्यांना आपण कळत किंवा नकळतपणे अदाणी समूहाच्या माध्यमातून प्रदूषणकारक प्रकल्पांना हातभार लावला आहे का अशी शंका भेडसावत आहे. अदाणी समूहातील गुंतवणूक काढून घेण्यामागे हेही एक कारण सांगितले जाते.