अहिल्यानगर: स्वातंत्र्यापूर्वीपासून नगर जिल्ह्याचा बाज डाव्या चळवळीकडे झुकलेला होता. यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून या चळवळींच्या नेतृत्वाला काँग्रेसच्या वर्चस्वाखाली आणले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला याच सहकारातील मातब्बरांनी साथ दिली होती. आता याच सहकाराचा वापर करत भाजप नेतृत्वाने नगर जिल्ह्याचा बाज उजवीकडे झुकवला आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या नगर दौऱ्याने ही बाब अधोरेखित केली आहे.
सहकारातून उभे राहिलेले नेतृत्व सत्तेच्या सहकार्यशिवाय तग धरू शकत नाही, ही बाब यातून स्पष्ट होते. भाजपने पूर्वी जिल्ह्यातील सहकारातील नेतृत्व, त्यांची घराणेशाही, सहकारी संस्थांतून होणारी अडवणूक, याविरोधात वर्षानुवर्षे आंदोलने केली. त्याच भाजपचे नेतृत्व आता एकाच कुटुंबातील तिसरी-चौथी पिढी सहकार कसा जोपासत आहे, याचे कौतुक करत आहे. चेहरे तेच असले तरी सहकारातील या चेहऱ्यांचा बदललेला बाज अमित शहा यांच्या दौऱ्यातून स्पष्ट झाला. शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालय नेतृत्व आहे. या माध्यमातून भाजपमध्ये आता प्रस्थापित झालेले मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कारखान्याचा नुतनीकरण झाले तर कोल्हे कुटुंबीय राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे कुटुंबीयांना त्यादृष्टीने आश्वस्त केले. या दोन्ही कुटुंबीयांच्या सहकारातील वाटचालीचा शहा यांनी गौरव केला.
मूळ डाव्या चळवळीतून पुढे आलेल्या काँग्रेसजणांनी जिल्ह्यावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले. काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यातील बहुसंख्य सहकारातील नेतृत्वाने शरद पवारांना साथ दिली. मध्यंतरीचा युती सरकारचा अपवाद वगळला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनी परस्पर सहकार्याने, सामंजस्याने सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व ठेवले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर दोन्ही बाजूच्या नेतृत्वाने कधी भाजपचा तर कधी शिवसेनेचा एकमेकांविरुद्ध वापर करून घेत संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या.
केंद्र व राज्यामध्ये भाजप बळकट होऊन लागला तसा जिल्ह्यातील सहकाराच्या नेतृत्वाने आपला बाज बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांचा उजवा बाज आत्मसात केला. त्यातूनच कधी नव्हे ते इतिहासात प्रथमच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही भाजपच्या वर्चस्वाखाली आली. सहकारातील नेतृत्वही आता लव्ह जिहाद, लॅंड जिहादसारखी उजव्या चळवळीची भाषा सर्रासपणे वापरताना आढळत आहे. भाजपामध्ये नवा-जुना वाद सुरू झाला असला तरी सहकारातून पक्षात आलेल्या नव्या नेतृत्वाचे कौतुक भाजपने सुरू केले आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने केंद्र सरकारच्या ‘पॅकेज’चे लाभार्थी ठरले. ज्यांना आक्रमक हिंदुत्ववाद पेलवत नाही ते अजित पवार गटाकडे गेले आहेत, जात आहेत, तरीही त्यांना आपल्या संस्थांसाठी उजव्या विचारसरणीची कास पकडावी लागत आहे.
जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी दहा आमदार महायुतीचे आहेत. यातील अनेकांना सहकारातील नेतृत्वाची पार्श्वभूमी आहेत. अशी पार्श्वभूमी नसलेले नगरचे अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांच्यासारखे आमदारही आता बदललेला बाज ओळखत आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडू लागले आहेत. शिंदे गटाचे निवडून आलेले दोघेही पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत. या उजव्या विचारांच्या लाटेचा फटका सहकारातील दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांच्या सारख्यानाही बसला. नेतृत्व सहकारातले मात्र बाज उजव्या विचारसरांचा असे हे वेगळेच रसायन निर्माण झालेले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी नगर शहरात गोमासप्रकरणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आंदोलनासाठी पुढाकार घेतला होता. पाचपुते कुटुंबीय सहकार चळवळीतील. आंदोलन त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांच्या मदतीने केले. या आंदोलनात शहरातील भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. भाजपलाच बाजूला ठेवत उजव्या विचारांच्या चळवळी नवे नेतृत्व करू लागल्याची हे प्रतीक मानले जाते.