पुढच्या वर्षी तमिळनाडूत पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी अण्णाद्रमुक पक्षाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. निवडणुकीत अण्णाद्रमुक-भाजपा युती जिंकल्यास तमिळनाडूमध्ये युतीचे सरकार स्थापन होणार नाही, असे अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडापड्डी के. पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात युतीच्या पुनरुज्जीवनाची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या पक्षातील अनेकांना गोंधळात टाकल्याचं चित्र दिसत होतं. म्हणून पलानीस्वामी यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले.

एडापड्डी के. पलानीस्वामी काय म्हणाले?

“अमित शाह यांनी युती सरकार असेल, असे म्हटले नव्हते. तुम्ही चुकीचा अर्थ लावत आहात आणि चाली खेळण्याचा प्रयत्न करीत आहात, ते कृपया थांबवा,” असे पलानीस्वामी यांनी बुधवारी चेन्नई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. “राष्ट्रीय पातळीवर युतीचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि तमिळनाडूमध्ये मी नेतृत्व करीन. तुम्हाला ते समजले नाही का? काळजी करण्याचं कारण काय? सत्तेत परत येऊ इच्छित असल्याने आपण युती केली आहे आणि इतरांसोबत युती करण्याची इच्छा नाही”, असे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले.

त्यानंतर “आम्ही कोणासोबत युती करावी याबाबत सल्ला देण्याची क्षमता द्रमुककडे नाही”, असेही पलानीस्वामी म्हणाले. हे काही नवीन नसलं तरी गेल्या शुक्रवारी शाह यांच्या भेटीनंतर अण्णाद्रमुकमध्ये काहीशी कुरबुर अगदी लढाऊ स्वरात होऊ लागली. अण्णाद्रमुक-भाजपा युती पुढील सरकार स्थापन करेल एवढंच शाह यांनी भेटीदरम्यान म्हटल्याचे पलानीस्वामी यांनी सांगितले.
अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “स्पष्टीकरणामागे महत्त्वपूर्ण अंतर्गत अभिप्राय होता. आमच्या नेते आणि हितचिंतक यांच्याकडून अनेक कॉल आणि अभिप्राय आले होते. त्यांना असे वाटले की, शाह यांच्या भाषणात सत्तावाटपाचे संकेत होते. म्हणूनच त्यांना बुधवारी याबाबत सर्व काही स्पष्ट करावं लागलं.”

भाजपाची प्रतिक्रिया
पलानीस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाच्या नयनार नागेंद्रन यांनी म्हटले, “अमित शाह आणि पलानीस्वामी मिळून यावर निर्णय घेतील. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाद्वारे युती मजबूत करण्यासाठी जोर दिला गेला होता.”
पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं. “तमिळनाडूमध्ये कधीही सत्तावाटपाचे युती सरकार नव्हते. पलानीस्वामी यांच्याकडून स्पष्टीकरण अपेक्षित होते”, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. तसेच ही युती भावनिक नाही, तर रणनीतीपर आणि अंकगणितीय होती, असेही भाजपाच्या नेत्याने सांगितले.

दोन्ही पक्ष निव्वळ निवडणूक गणितावर अवलंबून आहेत. भाजपाचा असा विश्वास आहे की, अण्णाद्रमुकमुळे कोईम्बतूर, चेन्नईतील टी नगर व कन्याकुमारी यांसारख्या शहरी जागांवर त्यांचे स्थान चांगले राहील. अण्णाद्रमुकला अशी अपेक्षा आहे की, भाजपाच्या पाठिंब्याने दक्षिण आणि पश्चिम तमिळनाडूमध्ये त्यांची कामगिरी उंचावेल. निवडक मतदारसंघांमध्ये मतांचे हस्तांतर आणि द्रमुकविरुद्ध एक साधारण आघाडी असेल, असा तर्क आहे. सध्या तरी लढत आणि युती यामध्ये पलानीस्वामी यांनी रेषा आखली आहे. तमिळनाडूमध्ये नेतृत्व कोण करील याबाबत त्यांना कोणतीही अस्पष्टता ठेवायची नाही. मात्र, पक्षातील काही जणांना वाटते की, ही युती टिकण्यासाठी बांधलेली नाही. युतीने आपले पहिले पाऊल उचलले तरीही हळूहळू ती मोडण्याची भीती कायम आहे.

“केवळ अंकगणिताच्या दृष्टीने ही युती काम करीत असली तरीही रसायनशास्त्र अजूनही तुटलेले नाही”, असे अण्णाद्रमुकचे एक वरिष्ठ नेते व पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील माजी मंत्री म्हणाले. “सर्वांना माहीत आहे की, ही नैसर्गिक युती नाही. आपण जिंकलो किंवा नाही, ती फार काळ टिकणार नाही. सर्वांना ही भीती वाटत आहे की, अमित शाह आणि पलानीस्वामी यांची बैठक ही अण्णाद्रमुकच्या पतनाची अपरिहार्य सुरुवात आहे. आपल्या स्वत:च्या बैठका आणि नेतृत्वाकडे पाठवलेल्या अभिप्रायांमध्ये पक्षातील अनेकांनी भाजपाच्या इतर प्रादेशिक मित्रपक्षांशी तुलना केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार, महाराष्ट्रात शिवसेना, कर्नाटकमध्ये जेडीएस. आपल्या सर्वांना असे वाटत आहे की, अण्णाद्रमुकचे भविष्यही येत्या १० वर्षांमध्ये असेच होणार आहे. भाजपा आपल्याला श्वास घेऊ देणार नाही”, असेही या वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.

पलानीस्वामी यांनी बुधवारी जाहीरपणे विरोध केला आहे. “विधानसभा निवडणूक एकत्रित लढवून सत्ताधारी द्रमुकला सत्तेवरून हटवू इच्छिणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून भाजपा आमच्याकडे आली आहे”, असे पलानीस्वामी यांनी म्हटले. दरम्यान, अधिक पक्ष आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे, असेही ते पुढे म्हणाले.