Asaduddin Owaisi on Asim Muneer Nuclear Threat : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली. भारताबरोबरच्या संघर्षात भविष्यात आपल्या देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास थेट अण्विक हल्ला करू, अशी उघड धमकी त्यांनी अमेरिकेतून दिली. इतकंच नाही तर भारतानं सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर ते क्षेपणास्त्रांनी नष्ट करू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्याचा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख हा ‘सडकछाप माणूस’ असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे. ते एनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा सूड म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्ताननं सुरुवातीला या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय लष्करानं तो यशस्वीरित्या हाणून पाडला. ऑपरेशन सिंदूरमुळे भेदरलेल्या पाकिस्ताननं भारतीय लष्करप्रमुखांना फोन करून त्यांच्याकडे युद्धविरामाची झोळी पसरवली. या घटनेला तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली.

नेमके काय म्हणाले असीम मुनीर?

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताला थेट अण्वस्त्रहल्ल्याची धमकी दिली. द प्रिंटच्या वृत्तानुसार असीम मुनीर म्हणाले की, भारतानं सिंधू पाणी करार थांबवला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमधील २.५ कोटी लोकांवर उपासमारीचं संकट ओढवलं आहे. सिंधू ही भारताची खासगी मालमत्ता नसून नदीवर जर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते १० क्षेपणास्त्रांनी नष्ट करू. अमेरिकेतील प्लोरिडा येथील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर म्हणाले की, आपण एक अणुशक्तीसंपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटले की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू. दरम्यान, पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा भारतानं चांगलाच समाचार घेतला.

आणखी वाचा : राहुल गांधींविरोधातील वक्तव्य भोवलं? मंत्र्याला राजीनामा का द्यावा लागला? कारण काय?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख ‘सडकछाप’ : ओवैसी

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी असीम मुनीर यांच्यावर टीका करत त्यांना ‘सडकछाप माणूस’ असे संबोधले. “पाकिस्तान लष्करप्रमुखांचे वक्तव्य आणि धमकी निषेधार्ह आहे. दुर्दैव म्हणजे हे वक्तव्य अमेरिकेतून होत आहे, जी भारताची धोरणात्मक भागीदार आहे. ते ‘सडकछाप माणसा’सारखे बोलत आहेत,” अशी टीका त्यांनी एएनआयशी बोलताना केली. ते म्हणाले की, पाकिस्तानी लष्कर व त्यांच्या ‘डीप स्टेट’कडून भारतावर सातत्यानं धोका असतो, त्यामुळे आपल्याला संरक्षण खर्च वाढवावा लागेल, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीसाठी आपल्याला सजग राहता येईल.

याआधीही खासदार ओवैसी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानवर टीका केली होती. “पाकिस्तान लष्करप्रमुखांची भारताविरुद्धची धमकी व भाषा निंदनीय आहे. त्यांनी हे वक्तव्य अमेरिकन भूमीवरून केले आहे, ज्यामुळे ही बाब आणखीनच गंभीर ठरते. याबाबत मोदी सरकारकडून केवळ परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनाऐवजी राजकीय पातळीवर प्रतिसादाची आवश्यकता आहे,” असं ओवैसी म्हणाले होते.

“भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालत नाही”

  • भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही असिम मुनीर यांनी दिलेल्या अणुहल्ल्याच्या धमकीचा चांगलाच समाचार घेतला.
  • मुनीर यांनी दिलेल्या धमकीतून तो अतिशय बेजबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे सिद्ध झाले असून आपण अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी स्पष्ट केलं.
  • ‘अण्वस्त्रांची धमकी’ हे पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण असून अमेरिकेसारख्या भारताच्या मित्रराष्ट्राच्या भूमीवर केलेली ही विधाने धक्कादायक असल्याचा टोलाही भारताने लगावला.
  • पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी गटांचे साटेलोटे पुन्हा अधोरेखित झाल्याने तेथील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत शंकांना बळकटी मिळाली आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं.
Asaduddin Owaisi on Asim Muneer
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (छायाचित्र पीटीआय)

पाकिस्तानच्या लष्करात मोठं बंड होणार?

“अमेरिका जेव्हा-जेव्हा पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देते, तेव्हा त्यांचे खरे रंग समोर येतात. पाकिस्तानमध्ये लोकशाही अस्तित्वात नसून लष्कराचेच नियंत्रण असल्याचे हे द्योतक आहे. अमेरिकेनं मुनीर यांना पायघड्या घालून त्यांना चिथावणी दिल्यानं आता पाकिस्तानमध्ये बंड अटळ आहे. आताचे फील्ड मार्शल पाकिस्तानचे अध्यक्ष होतील. पाकिस्तानने वेळोवेळी अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या आहेत. मुनीर यांचे विधान दक्षिण आशियामधील आण्विक अस्थिरताही दर्शवते. नागरी सत्तेऐवजी लष्कराच्या हातात अण्वस्त्रांच्या चाव्या आहेत हे यातून दिसते”, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचा : अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? पुन्हा महामंदी येणार? १९२९ मध्ये काय घडलं होतं?

भाजपा-काँग्रेस नेत्यांची पाकिस्तावर टीका

दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. असीम मुनीर हे सातत्याने बेजबाबदार भडकाऊ विधाने करीत आहेत. अमेरिका अशा व्यक्तीला विशेष महत्त्व देते ही बाब विचित्र आहे. काँग्रेस या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करते, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “अण्वस्त्रांच्या धमक्या देणे ही पाकिस्तानची नेहमीची पद्धत आहे. अशा वक्तव्यांमधील गैरजबाबदारीबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वतः निष्कर्ष काढावेत. पाकिस्तानसारख्या देशात, जिथे लष्कर आणि दहशतवादी संघटना हातात हात घालून काम करतात, तिथे अण्वस्त्र नियंत्रण व्यवस्थेच्या प्रामाणिकतेबाबत असलेल्या शंकांना ही विधाने आणखी बळकटी देतात,” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.