नाशिक – महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलून नाशिकमधून ॲड. माणिक कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी दिली होती. भाजपने भुजबळ यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी ॲड. कोकाटेंना कृषिखाते बहाल केले. परंतु, रोखठोक, परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध कृषिमंत्री कोकाटे यांच्या नित्य नव्या कृत्याने पक्षासह आता उपमुख्यमंत्री पवार हेही अडचणीत आले आहेत.
विधिमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याची चित्रफित आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केल्यानंतर बचाव करताना खुद्द कोकाटे आणि राष्ट्रवादीची (अजित पवार) कोंडी झाली आहे. याच कारणावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर छावा संघटनेकडून पत्ते फेकण्यात आले. संतप्त अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देणाऱ्यांना बडवले. विरोधकांच्या आरोपांवर कृषिमंत्री कोकाटे यांनी, आपण भ्रंमणध्वनीवर डाऊनलोड झालेला खेळ बंद करत होतो इथपासून ते युट्युब सुरू करताना रमीची जाहिरात आली, रोहित पवारांनी अर्धवट चित्रफित प्रसारित केली, असे दावे केले.
कृषिमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून वादग्रस्त विधानांनी कोकाटे हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. कृषिखात्याची जबाबदारी मिळताच एका कार्यक्रमात त्यांनी हे खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे म्हटले होते. नंतर पीक विमा योजनेच्या विधानावरून वाद उद्भवला. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. सरकारने एक रुपयात पीक विमा दिला. त्याचा गैरफायदा लोकांनी घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना कर्जमाफी, पीक विम्याच्या पैशातून घरातील साखरपुडे, लग्न उरकली जातात, असे त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून म्हटले होते. मान्सूनपूर्व पावसात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेव्हा शेतात जे कांदे आहेत, त्याचे पंचनामे होतील, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा प्रश्न कोकाटे यांनी केला होता. वादग्रस्त विधानांमुळे पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना तंबी देखील दिली. तेव्हापासून काहिसे सावध पवित्रा घेणारे कोकाटे हे रमीत अडकले.
कृषिमंत्री कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. याच कारणास्तव नव्या मंत्रिमंडळात भुजबळांना डावलून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. स्थानिक पातळीवर मराठा समाजाचे माणिक कोकाटे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. काही महिन्यांनी भुजबळ यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला. परंतु, त्या शपथविधी सोहळ्याकडे ॲड. कोकाटे यांनी पाठ फिरवली होती. कोकाटे यांची कार्यशैली पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोत्यात आणणारी ठरू लागली आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडूनही दबाव वाढत आहे. त्यामुळे यातून अजित पवार हे कशी वाट काढणार, हे पाहावे लागेल.