नाशिक – राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेला नवीन धार चढली आहे. भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) वादात अनेक महिन्यांपासून हा पेच सुटलेला नसताना नुकतेच मंत्री बनलेल्या भुजबळांमुळे अजित पवार गट पुन्हा स्पर्धेत आला असताना भुजबळांच्या माध्यमातून भाजपनेच नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी डावपेच आखल्याची चर्चा आहे. 

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील मतभेद अजूनही मिटलेले नाहीत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, हे पद मिळविण्यासाठी सुरुवातीपासून तिन्ही पक्षात रस्सीखेच होती. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदी झालेल्या नियुक्तीला  शिंदे गटाच्या विरोधामुळे स्थगिती द्यावी लागली. कुंभमेळा नियोजनाची जबाबदारी महाजन हे सांभाळत आहेत. त्यासाठी त्यांचे दौरे होतात. प्रशासकीय बैठका घेतल्या जातात. मात्र, पालकमंत्रीपद नसल्याने त्यांनाही मर्यादा आल्याचे चित्र आहे.

महायुती याआधी सत्तेत असताना दादा भुसे यांच्याकडे नाशिकचे पालकत्व होते. त्यांच्यासाठी शिंदे गट पालकमंत्रीपदावरील दावा सोडण्यास तयार नसल्याने हा तिढा कायम आहे. या घटनाक्रमात भाजपशी जवळीक असणारे पण अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली. आणि या विषयाला वेगळे वळण मिळाले. भुजबळ यांनी अनेकदा नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाकडून आधीपासून त्यावर दावा सांगितला गेला होता.

भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर शहरात समर्थकांनी ठिकठिकाणी ‘नाशिकला वाली तुम्हीच, पालकमंत्री तुम्हीच’ अशा आशयाचे फलक झळकावले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भुजबळांना पालकमंत्री करावे म्हणून फलकबाजी होत आहे. अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे जिल्ह्यात दोन आमदार असणाऱ्या शिंदे गटात अस्वस्थता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे पाच आमदार असणाऱ्या भाजपने जिल्ह्यात कुणालाही मंत्रिपद दिलेले नाही. गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याची जबाबदारी आणि नाशिकचे पालकमंत्रीपद देऊन सिंहस्थ नियोजनात मित्रपक्षांचा हस्तक्षेप टाळण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यास यश येत नसल्याने भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन भाजपने नवीन डावपेच आखल्याचा अंदाज बांधला जात आहे.