दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील कारभार, वार्षिक सभा यांच्या पाठोपाठ संचालक मंडळाच्या निवडणुकीनेही वादाची उचल खाल्ली आहे. महामंडळातील सत्तासंघर्षातून दोन गटांनी स्वतंत्ररित्या निवडणूक जाहीर केली खरी; पण त्या दोन्हीही रद्दबादल ठरवत धर्मादाय विभागाने स्वतंत्रपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. डिसेंबर महिनाअखेरीस निवडणूक होण्याची शक्यता असून या निमित्ताने महामंडळातील कारभाराचा तमाशा पुन्हा एकदा समोर येणार आहे.

चित्रपट महामंडळचा कारभार सातत्याने वादग्रस्त ठरला आहे. गेली दहा वर्षे तर प्रत्येक सभेमध्ये कारभाराच्या चिंधड्या उडत असतात. चित्रपट निर्मितीशी संबंधित कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना सामावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी या महामंडळाची स्थापना झाली. गेल्या दहा वर्षात तर उत्तरोत्तर गोंधळ वाढतच चालला आहे. प्रसाद सुर्वे, विजय कोंडके यांच्या कार्यकाळात वार्षिक सर्वसाधारण सभेचा आखाडाच झाला होता.

नवे पदाधिकारीही वादात

साडेसात वर्षांपूर्वी महामंडळाची निवडणूक झाली. तेव्हा मेघराज राजेभोसले हे अध्यक्ष, धनाजी आमकर उपाध्यक्ष, सुशांत शेलार मानद कार्यवाह, संजय ठुबे चिटणीस असे पदाधिकारी निवडले गेले. सुरुवातीला एकीचे वातावरण होते. याही संचालकांचा कारभार वादग्रस्त ठरला. परिणामी दोन्ही वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये प्रचंड गदारोळ उडाला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी महामंडळाच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली गेली. २०१० ते २०१५ दरम्यान झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी जून २०१८ मध्ये कोल्हापूर येथील धर्मादाय सहआयुक्तांनी महामंडळाच्या तत्कालीन कार्यकारिणी आणि व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांच्यावर ठपका ठेवून पुढील १० लाख ७८ हजारांची रक्कम महामंडळाकडे जमा करावी अन्यथा कार्यकारिणी आणि व्यवस्थापकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अभिनेते विजय पाटकर, प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल या दिग्गज मंडळींच्या कार्यकाळात हा गैरव्यवहार झाल्याने चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली होती.

दोन्ही गटाची नाचक्की

राजेभोसले हे आपला कारभार स्वच्छ गतिमान असल्याचा दावा करीत राहिले. विरोधकांनी त्यांच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची यादी वाचण्यास सुरुवात केली. संचालक मंडळातील वाद वाढत गेला. परिणामी जून महिन्यात राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव आणत सुशांत शेलार यांची अध्यक्षपदी निवड केली गेली. संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत संपल्याने अध्यक्ष व संचालकपदी कोणालाच राहता येत नाही असा सदस्यातून सूर निघू लागला. तीन महिन्यापूर्वी चित्रपट महामंडळाची निवडणूक घेतली जावी या मागणीसाठी चित्रकर्मींनी धर्मादाय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. हा रोख लक्षात घेऊन निवडणूक घेण्याची घाई दोन्ही गटाकडून सुरू झाली. प्रथम राजेभोसले यांनी महामंडळाच्या उपविधीमध्ये अध्यक्षांना निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार आहे; त्यानुसार निवडणूक घेत असल्याचे स्पष्ट करीत निवडणूक अधिकारी व मतदानाची प्रक्रिया जाहीर केली. लगेचच सुशांत शेलार यांनी आपण विद्यमान अध्यक्ष असल्याचा दावा करून विरोध केला. उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी निवडणुकीचा दुसरा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व गोंधळामध्ये अधिकृत निवडणूक कोणती याचा पेच महामंडळाच्या ५५ हजार सदस्यांमध्ये निर्माण होऊन जोरदार कुजबुज सुरू झाली. आपल्या निवडणूक कार्यक्रमाला मान्यता द्यावी यासाठी दोन्ही गटांनी धर्मादाय आयुक्तांकडे पाठपुरावा केला. एका महिन्यात दोन वेगवेगळ्या निवडणुका जाहीर केल्याने कायदेशीर पाठबळ नव्हते. धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी सुनावणी घेऊन या बेकायदेशीर ठरवल्या. खेरीज, त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी असलेले वकीलही बदलले आहेत. हे वकील महामंडळाच्या पॅनलवर असल्याने ते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करू शकत नाहीत असे स्पष्ट केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय निरीक्षक असिफ शेख तर निवडणूक नियंत्रक अधिकारी म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळांची नवी घटना मंजूर झाल्याचा दावा केला होता. धर्मादायुक्तांनी नव्या घटनेला मंजुरी नसल्याने जुन्या घटनेनुसारच निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करीत महामंडळाचे मुख्यालय असलेले कोल्हापूर, मुंबई, पुणे या तीन मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये राजेभोसले आणि त्यांच्या विरोधातील शेलार, यमकर या गटाची नाचक्की झाली आहे. निवडणूक प्रक्रिया नेमक्या कशा पद्धतीने घ्यावी याचे याबद्दलचे त्यांचे अज्ञान दिसून आले आहे, अशा प्रतिक्रिया आता चित्रकर्मींतून व्यक्त होत आहेत.

निवडणूक गाजणार

मतदार यादी निश्चित झाल्यानंतर चित्रपट महामंडळाची निवडणूक डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या वादग्रस्त कारभाराची झलक वार्षिक सभेत पाहायला मिळाली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील इमारतींची खरेदी अन्य व्यवहार यावरून लेखापरीक्षणातून शेरे मारले आहेत. आरोप – प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. राजेभोसले यांनी तर सर्व १७ जागा जिंकल्याशिवाय अध्यक्ष होणार नाही, असे आव्हान विरोधकांना दिले आहे. विरोधकांनी ‘ तुम्ही एकटे निवडून दाखवा ‘ असे आव्हान दिले आहे. दोन्ही गटाचा कारभार मान्य नसलेले अन्य गट असून त्यांच्याकडूनही निवडणुकीची तयारी सुरु असल्याने निवडणूक मागील वेळेपेक्षा आणखी गाजणार याची चिन्हे दिसू लागले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya marathi chitrapat mahamandal election will be have strong fight print politics news asj
First published on: 21-09-2022 at 16:17 IST