बिहार राज्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडून काँग्रेस, राजद तसेच अन्य पक्षांना सोबत घेऊन ‘महागठबंधन’ची स्थापना केली. सध्या येथे महागठबंधनचे सरकार आहे. नितीशकुमार यांच्या या प्रयोगामुळे राजकीय गणितं बदलली आहेत. बिहारमध्ये झालेला प्रयोग देशपातळीवरही अस्तित्वात आणावा, असा विचार विरोधकांकडून मांडला जात आहे. असे असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महागठबंधच्या प्रयोगाचे स्वागत केले आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला सक्षम विरोधक निर्माण व्हावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. असा प्रयोग झालाच तर सपाचा त्याला पाठिंबा असेल असे अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जम्मू आणि काश्मीरमध्ये २५ लाख नव्या मतदरांची नोंदणी होण्याची शक्यता

अखिलेश यादव यांनी बिहारमधील ‘महागठबंधन’च्या प्रयोगाचे स्वागत केले आहे. तसेच देशपातळीवर असा प्रयोग होणार असेल तर आमचा त्याला पाठिंबा असेल असेदेखील अखिलेश यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे भाजपासोबत युतीत असलेले अन्य पक्षदेखील नाराज असून लवकरच तेही युतीतून बाहेर पडतील असे भाकित अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या तयारीबाबत माहिती दिली आहे. समाजवादी पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी पक्षाची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यासाठी यावर्षी आम्ही राष्ट्रीय अधिवेशन भरवणार आहोत, असे अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पदयात्रेतून काँग्रेसची पक्षबांधणी आणि जनमानसाला साद

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला हार पत्करावी लागली. आझमगढ, रामगढ अशा बालेकिल्ल्यात सपाच्या उमेदवारांचा पराभव झाला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी निवडणूक आयोगाने निपक्ष:पणे काम केले नाही, असा आरोप केला. “देशात सध्या निपक्ष: अशी एकही संस्था उरलेली नाही. संस्थांवर दबाव टाकून केंद्र सरकार त्यांना जे हवे आहे, ते करवून घेत आहे. निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात अप्रामाणिकपणा केला. त्यांनी विरोधकांचा आवाज ऐकला नाही. मतदार यादीतून अनेकांची नावे वगळण्यात आली होती. रामपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान करण्यास मनाई करण्यात आली. सपाच्या अनेक कार्यकर्त्यांना लाल कार्ड देण्यात आले. निवडणूक आयोग यावेळी झोप काढत होता का?” असा सवाल अखिलेश यादव यांनी यावेळी केला.

हेही वाचा >>> कर्नाटक: भाजपाचा आरोप कॉंग्रेसच्या जिव्हारी, सक्रियता दाखवण्यासाठी कॉंग्रेसच्या नव्या योजना

दरम्यान, अखिलेश यांच्या मतावर भाजपाचे नेते तथा माजी केंद्रीय नेते रवीशंकर प्रसाद यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांनी विरोधकांच्या एकजुटीवर साशंकता व्यक्त केली आहे. “एचडी दैवगौडा, आय के गुजराल, तसेच व्ही पी सिंग यांचा काळ गेला आहे. आता देशाला स्थिर सरकार हवे आहे. तसेच जनेला विकास, प्रामाणिकपणा, तसेच प्रभावी नेतृत्व हवे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व गोष्टी दिल्या असून त्यांनी देशाची प्रतिष्ठा वाढवलेली आहे. विरोधकांमध्ये ऐक्य झाले तरीदेखील ते एकमेकांना किती समजून घेतात, यावर प्रश्नचिन्ह आहे,” असे मत रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav welcome bihar mahagathbandhan said will support this experiment for 2022 general election prd
First published on: 19-08-2022 at 10:41 IST