“प्रत्येक राज्यसभा खासदाराने एकदा तरी निवडणूक लढवावी, भाजपा हा एक प्रभावी आणि युतीसाठी अनुकूल पक्ष असल्याचे खासदारांनी ठामपणे लक्षात आणून द्यावे, तसेच खासदारांनी फक्त राम मंदिर या एकाच मुद्द्यावर विसंबून न राहता त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रत्यक्षात काम केले पाहीजे”, असे आणि इतर अनेक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या बैठकीत मांडले आहेत. सोमवार (३१ जुलै) पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए युतीमधील खासदारांच्या बैठका घेत आहेत. खासदारांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या बैठकांची सुरुवात करताना आपण तिसऱ्यांदा हमखास सत्तेत येणार, याचीही शाश्वती ते देत आहेत.

दक्षिणेतील राज्यांमध्ये कर्नाटक वगळता इतर राज्यात भाजपाकडे फारसे खासदार नाहीत. याठिकाणी भाजपा हा युतीमधील प्रभावी आणि अनुकूल भागीदार असल्याचे मोदी सांगत आहेत. त्यांनी खासदारांना संदेश देताना सांगितले की, भाजपा आपल्या मित्रपक्षांसोबत राज्यात सत्ता नसतानाही ठामपणे उभा राहतो. (तमिळनाडूमध्ये सत्ता नसतानाही भाजपाने अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षाला पाठिंबा दिलेला आहे.) एनडीएची स्थापना होऊन आता २५ वर्ष होत आहेत. एनडीएची स्थापना कोणत्याही एका व्यक्तीचा विरोध करण्यासाठी झालेली नाही, तर ती विशिष्ट उद्देश नजरेसमोर ठेवून झालेली आहे. तर विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी केवळ मोदींना रोखण्यासाठी झालेली आहे, असेही पंतप्रधान मोदी बैठकीत बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे वाचा >> विरोधकांची आघाडी ‘स्वार्थासाठी’, लोक त्यांचा अजूनही द्वेष करतात; पंतप्रधान मोदींनी खासदारांना दिला कानमंत्र

सोमवारी पश्चिम उत्तर प्रदेशमधील खासदारांसोबत पहिली बैठक संपन्न झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाजपा कसा आघाडीधर्म पाळतो, याचे दाखले त्यांनी दिले. २०२० साली बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकून आल्या तरी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद देऊ केले. तसेच महाराष्ट्रात भाजपाकडे दुप्पट जागा असतानाही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. तसेच पंजाबमध्ये अनेक वर्ष अकाली दलासमवेत सत्तेत भागीदार असताना भाजपाने कधीही उपमुख्यमंत्रीपदावर दावा केला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

पूर्व उत्तर प्रदेशमधील खासदारांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “राम मंदिर निर्माणाच्या आंदोलनाचा उगम भाजपा ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो, त्या विचारसरणीतून झालेला आहे आणि आपण हा विषय अखेरपर्यंत घेऊन जाणार आहोत. असे असतानाही आपण फक्त राम मंदिर या एकाच विषयावर विसंबून राहून जिंकू शकत नाहीत, आपण आत्मसंतुष्ट होता कामा नये.” लोकसभेत पुन्हा एकदा आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने युतीमधील पक्षांच्या मतदानाचा जनाधार मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठीच एनडीएमधील जुने घटक पक्ष आणि काही नवीन घटकपक्षांना घेऊन भाजपाने एनडीएमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३८ पक्षांना एकत्र घेऊन दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे याच दिवशी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक बंगळुरू येथे संपन्न झाली होती.

आंध्र प्रदेशमधील तेलगू देसम पार्टी आणि पंजाबमधील अकाली दल हे भाजपाच्या एनडीएमधील सर्वात जुने घटक पक्ष आहेत. ते सध्या एनडीएत सामील झाले नसले तरी त्यांनी युतीत सहभागी होण्यासाठी त्यांनी नकारही दिलेला नाही. एनडीएमध्ये सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष म्हणून भाजपा लहान पक्षांना फारसा सन्मान देत नाही, असे सांगितले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या बैठकांमधून मोदी ‘सब का साथ, सब का विकास’ हा संदेश जपतान दिसत आहेत. तसेच भाजपा सरकार हे जात आणि प्रदेश यांच्यात भेदभाव करत नसल्याचा संदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

तर दुसऱ्या बाजूला विरोधकांची आघाडी फक्त जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. आमच्यासाठी एकच जात आहे, ती म्हणजे गरीबी, असेही मोदी म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने महागाई विरोधात कसा लढा दिला आणि सरकारच्या कल्याणकारी योजनामुळे लोकांना कसा लाभ झाला, याची माहिती लोकांना देण्याचा एनडीएच्या खासदारांनी प्रयत्न करावा, यावर बैठकीमध्ये अधिक जोर देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मित्रपक्षाव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वपक्षीय खासदारांनाही संदेश दिला आहे. पहिल्याच बैठकीत मोदींनी राज्यसभेच्या खासदारांना सांगितले की, त्यांना पक्षाच्या सर्व राज्यसभा खासदारांना निवडणूक लढताना पाहायचे आहे. जेणेकरून त्यांनाही निवडणुकीचा अनुभव येईल. मग ती महानगरपालिकेची निवडणूक का असेना. भाजपाच्या राज्यसभेतील वरिष्ठ खासदारांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितल्याची बातमी समोर आली, त्या पार्श्वभूमीवर हे विधान समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० ऑगस्टपर्यंत खासदारांच्या बैठका घेणार आहेत. त्यासाठी ४० आमदारांचा एक – एक गट तयार करण्यात आला आहे.