प्रदीप नणंदकर

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार अमित विलासराव देशमुख हे विलासरावांसारखेच खास बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. विलासरावांचे प्रतिरूप म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या वागण्या बोलण्यातून गेल्या काही वर्षात सातत्याने आपल्याला कोणी विरोधक शिल्लकच राहू नये याची ते काळजी घेतात. त्यातून त्यांना सतत गोड गोड बोलायची सवय लागली आहे .

नागपूर येथील विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी ते बोलायला उभे राहिले, आपल्या भाषणात त्यांनी आपले वडील विलासराव देशमुख यांच्यापासून राज्यातल्या विविध मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देत सर्वांची नावे घेतली. सर्वांचाच हा प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या सहभागाबद्दलही कौतुक केले .पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा अधिकचे संख्या बळ एकनाथ शिंदे सरकारला आहे .आता आरक्षण देण्यासाठी आणखीन कुठले बळ हवे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मात्र आपल्या भाषणामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कसा सोडवला पाहिजे ?दिले जाणारे आरक्षण स्वतंत्र असावे की त्याचा ओबीसीत समावेश असावा? यासंबंधी कसलेही त्यांनी भाष्य केले नाही . मनोज जरांगेमुळे आपण ही चर्चा करत आहोत असे म्हणत मनोज जरांगेचेही अप्रत्यक्षरीत्या त्यांनी कौतुक केले .प्रश्न तर मांडला मात्र त्यातून कोणालाही दुखवायचे नाही हे त्यांनी सुचित केले .हीच त्यांनी पद्धत सर्वच बाबतीत वापरण्यास सुरुवात केली आहे. विलासराव देशमुख यांची बोलण्याची शैली ही अजूनही महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आहे .आपल्या बोलण्यातून विरोधकांची अवस्था ,’ते सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी करत .

हेही वाचा… मतपेरणीसाठी पालघरमध्ये सत्ताधाऱ्यांचे असेही तंत्र !

हेही वाचा… कोण हे सुधाकर बडगुजर ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लातूर जिल्ह्यातील शिवराज पाटील चाकूरकर हे देश पातळीवरील नेते गृहमंत्री ,राज्यपाल अशा अनेक पदावर त्यांनी काम केले. त्यांची पद्धत ही कोणालाही दुखवायची नाही .तात्विक चर्चा करत सर्वांशी चांगले संबंध कसे राहतील , याकडे ते लक्ष देतात .विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अमित देशमुख हे शिवराज पाटील चाकूरकरांशी जवळीक साधून आहेत व चाकूरकरांचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडल्याचे त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते आहे. अमित देशमुख यांच्या राजकारणाची सुरुवात ही विकास सहकारी साखर कारखान्याच्या प्रारंभापासून झाली .विलासरावांनी मांजरा उभा केला तर अमित देशमुखांनी विकास. अतिशय कमी काळात तो कारखाना उभा राहिला व अमित देशमुख यांचे राजकारणात लॉन्चिंग झाले . २००९ , २०१४ व २०१९ असे तीन वेळा ते लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की विरोधक हे त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतात. भाजप पिढ्यान पिढ्या देशमुखांच्या सोयीचे राजकारण करते. शिवसेना आणि अमित देशमुख यांच्यातील मेतकुट लातूर ग्रामीण मतदारसंघात पहावयास मिळाले आहे. पाणी भरायलाच असते हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतून सिद्ध झाले. असे असताना विरोधकांना तरी का दुखवायचे, असा प्रश्न स्वत:ला विचारत अमित देशमुख आता केवळ बोलणे लांबवतात. आता ट्वेंटी वन या कारखान्याच्या शाखा काढून त्यांनी साखर क्षेत्रात आपला दबदबा वाढवला आहे. त्यामुळे कोणाला न दुखवता साखर पेरणीत अमित देशमुख अग्रणी ठरू लागले आहेत.