Amit Shah Salwa Judum criticism ९ सप्टेंबरला देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडणार आहे. एनडीएने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार घोषित केले असून विरोधी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुदर्शन रेड्डी यांच्यावर त्यांच्या २०११ च्या ‘सलवा जुडूम’ निकालावरून जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, या निर्णयामुळेच देशात नक्षलवाद आणखी दोन दशके टिकून राहिला. अमित शाह नक्की काय म्हणाले? ‘सलवा जुडूम’ नक्की काय आहे? सुदर्शन रेड्डी यांनी या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली आहे? जाणून घेऊयात.

अमित शाह यांनी काय आरोप केले?

अमित शाह म्हणाले की, एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंध असलेले) यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवडण्यापूर्वी विरोधकांनी त्यांची डावी विचारसरणी विचारात घेतली असावी. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले, “त्यांनी ‘सलवा जुडूम’ बरखास्त केले. त्यांनी आदिवासींचा आत्मसंरक्षणाचा हक्क संपवला. याच कारणामुळे नक्षलवाद आणखी दोन दशके टिकून राहिला. त्यावेळी नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर होता, हे सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे, हा त्यांचा निकाल आहे.”

ते पुढे म्हणाले, “नक्षलवाद्यांनी उद्ध्वस्त केलेल्या शाळांमध्ये सीआरपीएफ आणि सुरक्षा दले तैनात होती. त्या आदेशामुळे त्यांना एका रात्रीत बाहेर काढले गेले. अनेक ठिकाणी सुरक्षा दलांवर हल्ले झाले. सुदर्शन रेड्डींपेक्षा राहुल गांधींनी यावर उत्तर द्यायला हवे, कारण याच कारणामुळे (डाव्या विचारसरणीमुळे) त्यांना निवडण्यात आले आहे. या निकालामुळे नक्षलवाद्यांना संरक्षण मिळाले आहे.” गृहमंत्री म्हणाले की, ‘सलवा जुडूम’ची स्थापना आदिवासींनी केली होती. त्यांना शिक्षण, रस्ते आणि आरोग्य सेवांसारख्या सुविधा हव्या होत्या. “ते त्यांच्या संरक्षणासाठी होते, जे सर्वोच्च न्यायालयाने बरखास्त केले,” असे ते म्हणाले.

९ सप्टेंबरला देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडणार आहे. एनडीएने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार घोषित केले असून विरोधी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अमित शाहांच्या आरोपांवर सुदर्शन रेड्डी काय म्हणाले?

गेल्या शुक्रवारी अमित शाह यांनी रेड्डी यांच्यावर त्यांच्या ‘सलवा जुडूम’ निकालावरून टीका केली. ते असे व्यक्ती आहेत, ज्यांनी नक्षलवादाला मदत केली असा आरोप त्यांनी केला. “सुदर्शन रेड्डी हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी नक्षलवादाला मदत केली. त्यांनी ‘सलवा जुडूम’चा निकाल दिला. जर ‘सलवा जुडूम’चा निकाल दिला नसता तर नक्षलवादी दहशतवाद २०२० पर्यंत संपला असता.”

अमित शाह यांच्या आरोपांवर उत्तर देताना सुदर्शन रेड्डींनी सांगितले की, हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा होता, त्यांचा वैयक्तिक नव्हता. “‘सलवा जुडूम’वरील निकाल सर्वोच्च न्यायालयाचा होता, माझा नाही. मला गृहमंत्र्यांशी वाद घालायचा नाही,” असे त्यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. ते पुढे म्हणाले की, आगामी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक दोन व्यक्तींमधील स्पर्धा नसून, दोन भिन्न विचारसरणींमधील स्पर्धा आहे.

‘सलवा जुडूम’ नक्की काय आहे?

  • अमित शाह यांनी हे आरोप करताना २०११ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख केला.
  • हा निकाल तत्कालीन न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांनी दिला होता. या निर्णयाने छत्तीसगडमधील भाजपाच्या मोहिमेला बेकायदा आणि असंविधानिक ठरवले.
  • तत्कालीन रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने स्थानिक आदिवासी तरुणांना विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) म्हणून भरती करून माओवादी बंडखोरांविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे देण्याची मोहीम राबवली होती.

हे विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) ‘कोया कमांडो’ किंवा ‘सलवा जुडूम’ म्हणून ओळखले जात होते. ज्या आदिवासी भागात पोलिस आणि सुरक्षा दलांची पोहोच मर्यादित होती, तेथे माओवादी (नक्षलवादी) प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने त्यांना सरकार आणि सुरक्षा दलांच्या मदतीने वाढवण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या विशेष पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित निःशस्त्र करण्याचे आदेश दिले गेले.

एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्यावरील टीकेला अमित शाहांचे उत्तर

विरोधकांनी असा दावा केला आहे की, एनडीएने पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे. शाह यांनी हा दावा फेटाळून लावला आणि म्हणाले की, त्यांची निवड त्यांच्या योग्यतेनुसार झाली आहे. त्यांना माजी खासदार आणि विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून मोठा अनुभव आहे.

शाह म्हणाले, “उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार दक्षिणेतून येणे स्वाभाविक आहे, कारण राष्ट्रपती पूर्वेकडील आहेत, पंतप्रधान पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील आहेत. सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास खूप मोठा आहे. ते दोन वेळा खासदार राहिले आहेत, ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, झारखंड, तेलंगणा, पाँडिचेरी आणि महाराष्ट्राचे ते राज्यपाल होते.”

राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पार्श्वभूमीशी जोडणाऱ्या विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिले. शाह यांनी प्रश्न उपस्थित केला आणि म्हटले की, संघाशी संबंध असणे ही एक नकारात्मक बाब आहे का? अमित शाह म्हणाले, “पंतप्रधानांचा संघाशी संबंध आहे. माझाही संघाशी संबंध आहे. देशाने आम्हाला संघाचे आहोत म्हणून निवडले आहे का? संघाशी संबंध असणे नकारात्मक बाब आहे का? अटलबिहारी वाजपेयी, अडवाणीजी, मोदीजी यांचाही संघाशी संबंध आहे,” असे ते म्हणाले.