अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होणार आहे. पैठणी देऊन मते मिळवल्याच्या आरोपांमुळे डिसेंबर २०२० मध्ये झालेली निवडणूक गाजली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे निवडून आले होते. आता शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज भवितव्य आजमावण्यासाठी मतदार नोंदणीच्या धावपळीला लागले आहेत.
गेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांना धूळ चारून किरण सरनाईक यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला होता. माजी मुख्यमंत्री, मंत्री, बड्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पाचही जिल्हे पिंजून काढले होते. सभा बैठका घेतल्या होत्या, पण सर्वांवर मात करून किरण सरनाईक हे विजयी झाले. किरण सरनाईक हे वाशीम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्षही होते. संस्थाचालक मंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे. प्रसार माध्यमांपासून दूर राहून काम करण्याची त्यांची शैली ही चर्चेत असते. आता त्यांच्या विरोधात राजकीय पक्ष कोणती व्यूहनीती ठरवणार, याची चर्चा रंगली आहे.
शिक्षक मतदारसंघात सुमारे ४० हजार मतदारांची नोंदणी होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत पुर्वी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक भारती अशा शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सर्वसाधारणपणे रिंगणात राहत असत. त्यांना राजकीय पक्ष पाठिंबा देत असत. पण आता थेट राजकीय पक्षांनीच या निवडणुकांमध्ये उडी घेतली आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपतर्फे नितीन धांडे, शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे, अपक्ष संगीता शिंदे, शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांच्यासह एकूण २७ उमेदवार रिंगणात होते. फारसे चर्चेत नसलेल्या किरण सरनाईक यांनी बाजी मारली. त्यांनी १५ हजार ६०६ मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. संगीता शिंदे या भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून भवितव्य आजमावले होते.
कार्यक्रम जाहीर…
निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल आणि पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा कार्यक्रम पाठवण्यात आला आहे.
३० सप्टेंबरपासून निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. त्याच दिवशी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२५ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे.
१५ ऑक्टोबरला दुसरी अधिसूचना जारी होईल. २५ ऑक्टोबरला तिसरी अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाईल. मतदार नोंदणी ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. २० नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार होईल.
विभागीय आयुक्त २५ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतील. १२ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. २५ डिसेंबरपर्यंत सुनावणी होईल. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
या मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ हे पाच जिल्हे येतात.