YSRCP MP Avinash Reddy Arrested : लोकसभा व त्यापाठोपाठ झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला. आता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, त्याआधीच भाजपाचे मित्रपक्ष व विरोधी गोटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पक्षाचा (YSRCP) गड असलेल्या पुलिवेंदुला व त्याशेजारील वोंटीमिट्टा येथे जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ (ZPTC) पोटनिवडणुकांदरम्यान मंगळवारी (तारीख १२ ऑगस्ट) तणाव निर्माण झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे चुलत भाऊ खासदार अविनाश रेड्डी यांना पोलिसांनी तडकाफडकी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर राज्यात हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच खासदार अविनाश रेड्डी यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोटनिवडणुका शांततेत व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी टीडीपीचे आमदार रामगोपाल रेड्डी व त्यांच्या समर्थकांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे वायएसआर काँग्रेसने पोलिसांचा हा दावा फेटाळून लावला. कोणतीही पूर्वकल्पना व सूचना न देता खासदार रेड्डी यांना अटक करण्यात आल्याचा आरोप वायएसआर काँग्रेसने केला.

वायएसआर काँग्रेसचा दावा काय?

तेलुगू देसम पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून बूथ कॅप्चरिंग होत असल्याची तक्रार केल्यानंतर खासदार रेड्डी यांच्याबरोबर पोलिसांनी गैरवर्तन केलं. राज्यातील पोलिस सत्ताधाऱ्यांसाठी उघडपणे काम करीत असून हे स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी टीका वायएसआर काँग्रेसने केली. पक्षाचे राज्य सचिव सतीश रेड्डी यांनाही ताब्यात घेतल्याचा दावा विरोधकांनी केला. टीडीपी तसेच जन सेना पक्षाचे (JSP) शेकडो कार्यकर्ते पुलिवेंदुलामध्ये तणाव निर्माण करण्यासाठी आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता विरोधी पक्षातील नेत्यांनाच अटक केली, असंही त्यांनी म्हटलं.

आणखी वाचा : योगी आदित्यनाथांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदाराची पक्षातून हकालपट्टी; कोण आहेत पूजा पाल?

आंध्र प्रदेशात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आहेत. राज्यात सध्या जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघातील पोटनिवडणुका होत आहेत. चित्तूरच्या रामकुप्पम, पलनाडूच्या करमपुडी आणि नेल्लोरच्या विदावलूर येथे होणाऱ्या मंडल परिषद प्रादेशिक मतदारसंघ (MPTC) पोटनिवडणुकांबरोबर या निवडणुका होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. दुसरीकडे, विरोधकांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आणखी एक धक्का देण्यासाठी सत्ताधारी वेगवेगळी रणनीती आखत आहेत.

पोटनिवडणुकीत गैरप्रकार होतोय : वायएसआर काँग्रेसचा आरोप

कडप्पा हा जिल्हा वायएस राजशेखर रेड्डी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला येथील १० पैकी केवळ तीनच जागांवर विजय मिळवता आला होता. दरम्यान, पोटनिवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्ष सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, ८ ऑगस्ट रोजी मतदान केंद्रे गावांमधून दूर हलवण्यात आली, ज्यामुळे आमच्या पक्षाच्या सुमारे चार हजार समर्थक मतदारांना मतदानासाठी २ ते ४ किलोमीटपर्यंत पायपीट करावी लागत आहे. या प्रवासात त्यांच्यावरील हल्ल्याचा धोका वाढला असून बूथ कॅप्चरिंग व बनावट मतदानाची शक्यता वाढली आहे.

सोमवारी आठवडाभर चाललेल्या प्रचार मोहिमेनंतर वायएसआर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विजयवाड्यातील राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेलुगू देसम पार्टीकडून केली जाणारी लोकशाही पायमल्ली तातडीने थांबवावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयुक्त नीलम साहनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महिलांना मतदान करू न देणे, पुलिवेंदुलाचे उमेदवार हेमंत रेड्डी यांना नजरकैदेत ठेवणे व पोलिसांचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणण्याचे सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत, त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करावी असं या निवेदनात म्हटलं आहे.

MP Y S Avinash Reddy arrested
वायएसआर काँग्रेसचे खासदार अविनाश रेड्डी (छायाचित्र पीटीआय)

पोटनिवडणुका रद्द करण्याची विरोधकांची मागणी

वायएसआर काँग्रेसचे नेते साके सैलजनाथ यांनी या पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी केली. लोकशाहीला लाज आणणाऱ्या या निवडणुका आहेत, असा घणाघात त्यांनी केला. “तेलुगू देसम पार्टी यंत्रणांचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रिया बिघडवत आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीत असे अनैतिक प्रकार मी कधीच पाहिले नाहीत. निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं असून पोलिसांनीही टीडीपीच्या गुंडांना बनावट मतदान करण्यास परवानगी दिली. ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे”, असं सैलजनाथ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्याकडूनच मतचोरी? भाजपाने नेमके कोणते आरोप केले?

निवडणुकांमध्ये कोण मारणार बाजी?

पुलिवेंदुला पोटनिवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे नेते हेमंत रेड्डी यांची लढत टीडीपीच्या उमेदवार लता रेड्डी व काँग्रेसचे उमेदवार शिव कल्याण रेड्डी यांच्याशी होत आहे; तर वोंटिमिट्टा पोटनिवडणुकीत टीडीपीचे उमेदवार कृष्णा रेड्डी यांच्यासमोर वायएसआर काँग्रेसचे नेते सुब्बारेड्डी यांनी आव्हान उभं केलं आहे. पुलिवेंदुलाची पोटनिवडणूक महेंदर रेड्डी यांच्या निधनामुळे, तर वोंटिमिट्टातील पोटनिवडणूक अमरनाथ रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे होत आहे. दरम्यान, वायएसआर काँग्रेसने केलेले सर्व आरोप सत्ताधारी पक्षाने फेटाळून लावले. सर्व पोटनिवडणुकांची सर्व प्रक्रिया लोकशाही पद्धतीनेच पार पडत असून विरोधक अपप्रचार करीत आहेत, असं राज्याच्या गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनी म्हटलं आहे. या पोटनिवडणुकांमध्ये नेमका कुणाचा विजय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.