आंध्र प्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूकदेखील होत आहे. या ठिकाणी तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस या प्रादेशिक पक्षांचेच प्राबल्य अधिक आहे. “मुस्लिमांनी जर भाजपाला मतदान केले नसते, तर तिथे योगी आदित्यनाथ दोन वेळा मुख्यमंत्री झाले असते का”, असा प्रश्न टीडीपीच्या एका उमेदवाराने विचारला आहे. मुस्लीम भाजपाला मतदान करीत नाहीत, हा समज चुकीचा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपा आणि अल्पसंख्याकांची मते यावर भाष्य केले आहे.

भाजपाबरोबर युती केल्यामुळे तुमचे अल्पसंख्याक मतदार कमी होतील, असे वाटते का, या प्रश्नावर उत्तर देताना आंध्र प्रदेशमधील नरसरावपेठमधील टीडीपीचे उमेदवार लवू श्रीकृष्ण देवरायालू यांनी हे विधान केले आहे. त्यांनी नुकताच आपल्या खासदारकीचा राजीनामा देत वायएसआर काँग्रेस पक्षाला राम राम केला आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) मध्ये प्रवेश केला. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी देवरायालू यांना नरसरावपेठ जागेवरूनच उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत YSRCP चे उमेदवार पी. अनिल कुमार यादव यांच्याशी होणार आहे.

हेही वाचा : अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवरायालू यांनी विविध विषयांवर मते मांडली आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याचा निर्णय, भाजपा आणि पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षाबरोबर (जेएसपी) टीडीपीने केलेली युती आणि इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. वायएसआर काँग्रेस पक्ष सोडून टीडीपीकडून उमेदवारी घेतल्याचा नकारात्मक परिणाम होईल का, या प्रश्नावर ते म्हणाले, “अजिबात नाही. मी माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी नेहमीच उपलब्ध राहिलेला खासदार आहे. पक्षाची भूमिकाही महत्त्वाची ठरते, याबाबत मी सहमत आहे. मात्र, पक्ष कोणताही असो, माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी नेहमीच उभे राहतील. पक्ष बदलल्यानंतर माझ्या समर्थकांपैकी काहींचा हिरमोड नक्कीच झाला; मात्र ते मला समजून घेतील, अशी मला अपेक्षा आहे.”

आंध्र प्रदेशात लोकसभेचे २५; तर विधानसभेचे १७५ मतदारसंघ आहेत. तिथे वायएसआर काँग्रेस पक्ष (YSRCP) सत्तेत आहे. आंध्र प्रदेशमधील नरसरावपेठमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आपल्या प्रचाराबद्दल माहिती देताना ते म्हणाले, “प्रचार फारच चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि मला लोकांकडून फारच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. माझ्या मागील लोकसभा कारकिर्दीतही मी लोकांसाठी नेहमी उपलब्ध असायचो. त्यामुळे लोकांमध्ये जाणे आणि त्यांच्या समस्या ऐकणे ही माझ्यासाठी काही नवी गोष्ट नाही.”

आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी खूप आधीपासूनच प्रलंबित आहे. तसेच एन. चंद्राबाबू नायडूंवरील भ्रष्टाचाराचे खटले, जगनमोहन रेड्डींवरील हल्ला व वाय. एस. विवेकानंद रेड्डींची हत्या हे मुद्देदेखील प्रचारात महत्त्वाचे ठरताना दिसत आहेत. प्रचारामध्ये तुम्ही कोणते मोठे मुद्दे उपस्थित करीत आहात, या प्रश्नावर देवरायालू म्हणाले, “या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रचार करतो आहे. शेतीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी व शिक्षण हे ते तीन मुद्दे होय. माझ्या मतदारसंघाला यावेळी दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्वांत आधी त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करणे हेच माझे लक्ष्य राहील.” पुढे ते म्हणाले, “पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही फार गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा ठरतो आहे. मी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीन. शिक्षणाबाबत वायएसआर काँग्रेसने फार काही केलेले नाही. रोजगार मिळवायचा असेल, तर चांगल्या शिक्षणाची फार गरज आहे. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी मी मतदारसंघातील शैक्षणिक संस्थांना मजबुती देण्याचे काम करीन.”

हेही वाचा : इंडिया आघाडीवर लोकांचा विश्वास नसल्याने मतदानात घट; राजनाथ सिंहांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाबरोबर टीडीपीने युती केल्यामुळे अल्पसंख्याक मतदार कमी होतील का, या प्रश्नावर ते म्हणाले, “मुस्लीम भाजपासाठी मतदान करीत नाहीत, हा गैरसमज मी सर्वांत आधी दूर करू इच्छितो. उत्तर प्रदेशचेच उदाहरण घ्या. मुस्लिमांनी जर भाजपाला मतदान केले नसते, तर तिथे योगी आदित्यनाथ दोन वेळा मुख्यमंत्री झाले असते का? त्यामुळे मुस्लीम भाजपाला मतदान करीत नाहीत, हा समज चुकीचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वायएसआर काँग्रेस हा फसविणारा पक्ष आहे हे आंध्र प्रदेशमधील अल्पसंख्याकांना समजले आहे. सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी अल्पसंख्याकांना अनेक आश्वासनं दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्यासाठी काहीही केलेलं नाही. भाजपा आणि जेएसपीबरोबर युती केल्यामुळे टीडीपी पक्षाची ताकद वाढली आहे.”