अनिकेत साठे

नाशिक : अगदी काल परवापर्यंत भाजपच्या कारभारावर आसूड ओढणारे आणि शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना साथ देत राज्यातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. खुद्द भुजबळांनी बंडखोरी केल्याची कुणालाही पुसटशीही पूर्वकल्पना नव्हती. भुजबळांचे हे दुसरे बंड आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे जे आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले, त्यात राष्ट्रवादीतील ओबीसींचे नेते भुजबळ यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काहींनी भ्रमणध्वनीवर प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी आपण बाहेरगावी असून नेमके काय घडले, याची माहिती नसल्याचे सांगितले. काही पदाधिकाऱ्यांसाठी भुजबळांची बंडखोरी, मंत्रिपद स्वीकारणे धक्कादायक होते. परंतु, अंदाज घेऊन यावर मत प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर भुजबळ हे सातत्याने टिकास्त्र सोडत होते. जाहीर सभांमधून ते सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढत होते. असे असताना रातोरात त्यांचे मनपरिवर्तन होऊन ते भाजपसोबत सत्तेत कसे सहभागी झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्थानिक पातळीवर शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पुलोदच्या प्रयोगावेळी पवार यांना नाशिकमधून पाठबळ मिळाले होते. मागील एक, दीड दशकात स्थानिक पातळीवर पक्षात भुजबळांचा शब्द प्रमाण मानला जात होता. मराठा समाजाचा त्यांच्या नेतृत्वाला विरोध असला तरी शरद पवार यांच्याशी संबंधामुळे कुणाचे फारसे काही चालले नव्हते. आता त्याच भुजबळांनी भाजपला साथ दिली आहे.

हेही वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी

पहाटेच्या शपथविधीवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर आणि नितीन पवार हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. यावेळीही झिरवाळ यांनी त्यांना साध दिली आहे. बनकर, पवार हे पुन्हा अजितदादांना साथ देण्याची शक्यता आहे. सिन्नरचे माणिक कोकाटे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा… भाजपबरोबर गेलेले चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगावमधील राष्ट्रवादीतील एकमेव आमदार अनिल पाटील यांच्या बंडखोरीबद्दल स्थानिक पदाधिकारी अनभिज्ञ होते. जळगावचे राष्ट्रवादीचे महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी यांनी याबद्दल कुठलीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. तर जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी पक्षात बंडखोरी झाली असली तरी आम्ही शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. पाटील यांच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात समर्थकांनी एकच जल्लोष केला. अजित दादांचे कट्टर समर्थक असणारे पाटील हे राष्ट्रवादीचे प्रतोद आहेत. अजित दादांच्या यापूर्वी बंड करून सकाळी घेतलेल्या शपथविधीच्यावेळी ते त्यांच्यासोबत होते.