Asaduddin Owaisi Advice To Mahagathbandhan : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षानेही या आघाडीत सामील होण्याची तयारी दर्शवलीय. तसा प्रस्तावही त्यांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाकडे पाठवला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ओवैसी यांनी स्वबळावरच निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या आठवड्यात एआयएमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. ओवैसींनी महाआघाडीत सामील होण्याची शक्यता खुली ठेवली असली तरी ते आपल्या प्रचारातून आरजेडीला लक्ष्य करीत आहेत.
एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते आदिल हसन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, महाआघाडीत सामील होण्याच्या आमच्या प्रस्तावाला लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यांनी अद्याप कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, त्यांनी तयारी दर्शवली, तर आम्ही भाजपाला पराभूत करण्यासाठी महाआघाडीला हातभार लावू शकतो. विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी ५० जागांवर उमेदवार देण्याची आम्ही तयारी केली आहे. त्यातील चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे.
एमआयएमकडून कोण निवडणूक लढवणार?
गेल्या आठवड्यात एआयएमआयएमने बहादूरगंज विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद तौसीफ आलम यांची उमेदवारी जाहीर केली; तर बलरामपूरमधून हसन अली, बैसी मतदारसंघातून गुलाम सरवर आणि ढाकामधून राणा रणजीत यांच्या उमेदवाराची घोषणा केली. तौसीफ आलम यांनी २०२० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बहादूरगंजमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता; तर गुलाम सरवर यांनी बैसीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
बिहारमधील मुस्लीमबहुल सीमांचल विभागात अररिया, पूर्णिया, कटिहार व किशनगंज हे जिल्हे येतात. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने याच भागातील पाच विधानसभा मतदारसंघांत दणदणीत विजय मिळाला होता. यंदाच्या निवडणुकीत मिथिलांचल व मगध या प्रदेशांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा ओवैसी यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. सोमवारी आणि मंगळवारी ओवैसी यांनी सीमांचल, मिथिलांचल व मगध या तिन्ही भागांमध्ये जंगी सभा घेतल्या आहेत. २०२० च्या निवडणुकीत एआयएमआयएमने बहादूरगंज व बैसी या दोन मतदारसंघांत अनुक्रमे ४९.८% व ३८.३% मते मिळवून विजय मिळवला होता; तर बलरामपूर व ढाका या जागांवर पक्षाने उमेदवार दिला नव्हता.

असदुद्दीन ओवैसी नेमकं काय म्हणाले?
मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना असदुद्दीन ओवैसी यांनी एक मोठे विधान केले. “मुस्लिमांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पक्षाने लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना पत्र लिहिले होते. एमआयएमला महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व अमौरचे आमदार अख्तरुल इमान यांनी अनेकदा विनंतीही केली. आम्ही फक्त सहा जागांची मागणी केली होती आणि कोणतेही मंत्रिपद मागितले नाही. तरीसुद्धा ते आमच्याशी बोलण्यास तयार नाहीत. बिहारमधील जनतेने हे ओळखले पाहिजे की, मोदी-अमित शाह-नीतिश कुमार यांचे सरकार पुन्हा येऊ नये यासाठी कोण प्रयत्नशील आहे. तेजस्वी यादव आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या नेत्यांना त्यांचा अहंकारच कमकुवत करील”, असे ओवैसी म्हणाले.

असदुद्दीन ओवैसी यांचा महाआघाडीला सल्ला
सोमवारी दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघातील सभेतून ओवैसी यांनी तेजस्वी आणि लालू प्रसाद यादव यांना इशाराही दिला. “जर बिहारमध्ये भाजपाला पराभूत करायचे असेल, तर तुम्हाला ओवैसी आणि अख्तरुल इमान यांचा हात धरावा लागेल,” असे ते म्हणाले. यावेळी ओवैसी यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय जनता दल पक्षाबरोबर गेलेल्या चार आमदारांवरही जोरदार टीका केली. “अशा गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका. योग्य वेळ आल्यानंतर पक्ष त्यांना नक्कीच उत्तर देईल. ४ चा जवाब २४ ने दिला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. ओवैसी यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या मुस्लीम-यादव या पारंपरिक व्होट बँकेवरील निर्भरतेवरही टीका केली. त्यांनी मुस्लिमांना एमआयएम पक्षाच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.

बिहारमधील राजकीय समीकरण बदलणार?
२०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. मात्र, त्यानंतर एमआयएमच्या निवडून आलेल्या पाचपैकी चार आमदारांनी लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करून राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला होता. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्ष महाआघाडीत सामील झाल्यास विरोधी मतांचे विभाजन टळेल आणि विरोधकांना त्याचा मोठा फायदा होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. सीमांचलसारख्या अल्पसंख्याकबहुल भागात महाआघाडीची ताकदही वाढेल, असे सांगितल जात आहे. मात्र, तरीदेखील तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाला महाआघाडीत सामावून घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

असदुद्दीन ओवैसी महाआघाडीला का नकोसे?
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल पक्षाची मोठी ताकद आहे. अल्पसंख्याक-बहुल भागातील अनेक मुस्लीम मतदारांनी आरजेडीला आधीच पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळेच एमआयएमला महाआघाडीत घेण्याची त्यांना कोणतीही गरज नाही, असे पक्षातील एका सूत्राने सांगितले. बिहारमधील मागील निवडणुकीत एमआयएमने जिंकलेल्या पाच जागांबाबत विचारले असता, राष्ट्रीय जनता दलातील एका नेत्याने सांगितले की, खरे तर निवडून आलेले चारही आमदार आरजेडीचेच नाराज नेते होते. पक्षाने त्यांना निवडणुकीचे तिकीट न दिल्यामुळे ते ओवैसी यांच्या छावणीत गेले आणि जिंकल्यानंतर पुन्हा परत आले. या आमदारांचे लालू प्रसाद यादव यांच्याशी जुने राजकीय संबंध आहेत. “ओवैसी यांच्या हैदराबादमधील बालेकिल्ल्यात राष्ट्रीय जनता दल पक्षाने काही जागांची मागणी केली, तर ते त्यासाठी तयार असतील का,” असा प्रश्नही या नेत्याने उपस्थित केला.