MLA controversy patna AIIMS जनता दल (युनायटेड)चे आमदार चेतन आनंद यांच्यावर एम्समधील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या दबाव वाढत आहे. चेतन आनंद आणि त्यांची पत्नी आयुषी सिंह यांच्यावर एम्स पाटणाच्या निवासी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आणि निवासी डॉक्टरांना धमकावल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी जेडीयू नेत्याच्या गैरवर्तन आणि उद्धट वागणुकीविरोधात निवासी डॉक्टरांनी संपही पुकारला आहे. चेतन आनंद हे पाटणा येथील शिवहरचे आमदार आहेत.
चेतन आनंद कोण आहेत?
- चेतन आनंद यांचे वडील आनंद मोहन हे माजी खासदार होते. ते जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांच्यासह समता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
- त्यांची आई लवली यादव सध्या जेडीयूच्या शिवहरच्या खासदार आहेत.
- १९९० च्या दशकाच्या मध्यात आनंद मोहन यांनी लालू प्रसाद आणि राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) जोरदार विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी ‘बिहार पीपल्स पार्टी’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.
- मात्र, १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात बिहार पीपल्स पार्टीने लालू प्रसाद यांच्याशी हातमिळवणी केली.
- १९९४ मध्ये तत्कालीन गोपालगंजचे जिल्हाधिकारी जी. कृष्णय्या यांच्या जमावाने केलेल्या हत्येप्रकरणी आनंद मोहन यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू झाली होती.
त्यानंतर आनंद मोहन यांचे कुटुंब राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांची प्रासंगिकता कमी होऊ लागली. २०२० मध्ये चेतन यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगितले. आरजेडीने त्यांना तिकीट दिले आणि त्यांनी शिवहरमधून निवडणूक जिंकली. निवडणूक प्रचारादरम्यान आणि नंतरही चेतन यांनी त्यांच्या वडिलांच्या सुटकेची मागणी केली होती. तेव्हा त्यांचे वडील कृष्णय्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.
२००८ मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने आनंद यांची शिक्षा कमी करून जन्मठेपेत बदलली होती. १० एप्रिल २०२३ रोजी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने त्यांच्या कारागृह मॅन्युअलमध्ये बदल केला. २४ एप्रिल रोजी बिहारच्या कायदा विभागाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. नितीश सरकारच्या काळात शिक्षामाफीचा निर्णय झाल्यानंतर आनंद मोहन यांचे कुटुंब जेडीयूच्या जवळ येत असल्याची चिन्हे दिसू लागली. आनंद मोहन यांच्या सुटकेनंतर, नितीश कुमार यांना कुटुंबाच्या सहर्षा जिल्ह्यातील मूळ गावी आमंत्रितही करण्यात आले होते.
फेब्रुवारी २०२४ च्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी, लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी नितीश यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळाला. चेतन यांनी इतर दोन आरजेडी आमदारांबरोबर जेडीयूमध्ये प्रवेश केला आणि नितीश यांच्या बाजूने १२९ मते मिळवण्यात मदत केली. विरोधकांनी मतदानापूर्वी सभात्याग केल्यामुळे त्यांच्या विरोधात एकही मत पडले नाही. विश्वासदर्शक ठरावाच्या आधी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यांच्या कुटुंबाने पाटणा पोलिसांकडे चेतन बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. चेतनच्या शोधात पोलीस आरजेडी नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या निवासस्थानीही पोहोचले होते.
विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी चेतन सभागृहात आले आणि इतर दोन आरजेडी बंडखोरांसह थेट सत्ताधारी बाकांवर बसले. या तीन बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करण्याची आरजेडीची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे अजूनही प्रलंबित आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लवली यांना शिवहरचे तिकीट देण्यात आले. त्यांनी आरजेडीच्या उमेदवार रितू जयस्वाल यांचा २९,००० मतांनी पराभव केला.
चेतन यांनी पाटणा एम्स प्रकरणावर आपली बाजू मांडण्यास नकार दिला; मात्र जेडीयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार त्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. ते म्हणाले, “पाटणा पोलिसांनी अजून तपास पूर्ण केलेला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून चेतन आनंद यांना रुग्णालयात रुग्णाची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमदारांसाठी एक विशिष्ट सुरक्षा प्रोटोकॉलदेखील असतो. पोलिसांनी तपास पूर्ण करण्यापूर्वीच डॉक्टरांनी संप का पुकारला?” असा प्रश्न त्यांनी केला. मात्र, आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले, “चेतन आनंद यांनी एम्समध्ये जे काही केले, त्यातून त्यांची सरंजामशाही मानसिकता दिसून येते. पाटणा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी आमची मागणी आहे.”