Azam Khan and Akhilesh Yadav Latest News : समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांची गेल्या महिन्यात जामिनावर सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते रामपूरमधील मुमताज पार्क परिसरातील त्यांच्या निवासस्थानी शांत जीवन जगत आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वांत प्रभावशाली नेत्यांमध्ये आझम खान यांची गणना होते. २०१९ नंतर त्यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर गुन्हे दाखल झाले. या खटल्यांच्या ओझ्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आझम खान यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी तुरुंगातील अनुभव आणि आपल्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा केली. त्या संदर्भातील हा आढावा…
मुस्लीम समुदायाचे नेतृत्व करणारे ७७ वर्षीय आझम खान तब्बल १० वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर जमिनीचा बेकायदा ताबा मिळवणे, फसवणूक करणे, जबरदस्तीने घुसखोरी करणे व द्वेषपूर्ण भाषणे देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आज (बुधवार) आझम खान यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रश्न : आपण जवळपास २७ महिने तुरुंगात घालवले, त्यावेळी काय अनुभव आला?
आझम खान : सीतापूरच्या तुरुंगात मला दिलेली वागणूक मानवतावादी होती. तुरुंगाधिकाऱ्यांनी माझ्याकडे माणुसकीच्या नात्यानेच बघितले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
प्रश्न : तुमचे राजकीय भवितव्य काय असेल, त्याबद्दल काही प्रश्न पडले आहेत का?
आझम खान : तुरुंगात असताना मला बाहेरून अनेक संदेश मिळाले; पण या फक्त गोष्टी आहेत. प्रत्यक्षात कुणीही माझ्याशी बोलण्याची हिंमत केली नाही. मी जे अनुभवले आहे, तेच तुम्हाला सांगतोय.
प्रश्न : तुमची आमदारकी रद्द झाल्यानंतर रामपूर सदरच्या पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवला, त्याकडे तुम्ही कसे पाहता?
आझम खान : मुळात भाजपा या मतदारसंघात कधी विजयच मिळवू शकला नसता; पण मला तुरुंगात डांबून त्यांनी आपला विजय सुकर केला. मी येथील राजघराण्यांचा प्रतिस्पर्धी असल्याने मला त्याची किंमत चुकवावी लागली. पोटनिवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास ती खरंच झाली कधी? जर कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा वृत्तपत्राने सत्य दाखवले असते, तर कदाचित क्रांती झाली असती.
आणखी वाचा : Asaduddin Owaisi : ‘भाजपाला पराभूत करायचे असेल तर…’ ओवैसींचा महाआघाडीला सल्ला; नेमकं काय म्हणाले?
प्रश्न : दिवंगत नेते मुलायम सिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात तुम्हाला काय फरक दिसतो?
आझम खान : मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. अगदी तळागाळात उतरून त्यांनी आपल्या पक्षाला बळकटी दिली. आमच्यापैकी कोणीही त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही; पण अखिलेशजी यांनीही पक्ष अगदी व्यवस्थितपणे सांभाळला आहे. आमच्या वैयक्तिक संबंधांबद्दल बोलायचे झाल्यास ते माझा खूप आदर करतात. राजकारणाच्या या नवीन युगात ते सर्वाxत सुसंस्कृत राजकीय नेते आहेत.
प्रश्न : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर मतचोरीचे आरोप केले आहेत, त्याबद्दल तुमचे मत काय?
आझम खान : मुळात हे सर्व दुय्यम मुद्दे आहेत. कोणीही मूळ मुद्द्याला हात घालत नाही. राहुल गांधी, अखिलेश यादव व तेजस्वी यादव यांनी लक्षात घेतले पाहिजे की, २०२२ मध्ये रामपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने अनेक मुस्लीम मतदारांना मतदान करू दिले नाही. त्यावेळी या नेत्यांनी लढा दिला असता, तर आज इतके नुकसान झाले नसते. कदाचित आज बिहारमधील मतदार यादीतील बदलांचा कोणताही परिणाम झाला नसता.
प्रश्न : समाजवादी पार्टीने रामपूर पोटनिवडणुकीचा मुद्दा मोठा केला नाही, असे तुम्हाला वाटते का?
आझम खान : कोणीच तो मुद्दा केला नाही; पण माझी कोणाबद्दलही कोणतीही तक्रार नाही. त्यावेळची राजकीय परिस्थिती अत्यंत कठीण होती आणि आजही तिथे दहशत कायम आहे. त्याविरुद्ध लढण्यासाठी एखाद्याला शहीद होण्याची तयारी ठेवावी लागेल.
प्रश्न : तुमच्या जवळचे काही लोक म्हणतात की, गेल्या पाच-सहा वर्षांत अखिलेश यादव यांनी यांनी तुम्हाला राजकीयदृष्ट्या पुढे जाण्याची संधी दिली नाही.
आझम खान : जर तुम्ही दोन-चार तास बसून राहिलात, तर या विषयावर एक पुस्तक लिहू शकता. मला राजकीयदृष्ट्या उभे राहण्यासाठी कधीच कोणाच्या आधाराची गरज पडली नाही. माझ्या अस्तित्वातच ती शक्ती आहे, जी मला जिथे हवे तिथे नेते.
प्रश्न : तुम्ही भूतकाळात काँग्रेसवर खूप टीका केली आहे. आता समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे, त्याबद्दल तुमचे मत काय?
आझम खान : मी अजूनही काँग्रेसचा टीकाकारच आहे; पण आता तसे करण्याची गरज भासत नाही. कारण- आपल्यासमोर अधिक घातक क्षेपणास्त्र आहे. मला जुन्या जखमा उकरून काढायच्या नाहीत. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी टिकून राहायला हवी. झाकलेली मूठ ही सव्वा लाखाची असते.
प्रश्न : इंडिया आघाडीबद्दल तुमचे काय मत आहे?
आझम खान : देशात मुस्लिमांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला या आघाडीत मुस्लीम समुदायाचे नेतृत्व करणारा कोणताही नेता दिसत नाही. इंडिया आघाडीच्या मंचावर मुस्लीम नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
प्रश्न : अखिलेश यादव तुम्हाला बुधवारी भेटायला येत आहेत. त्यांच्याबरोबर काय चर्चा करायची, याचा तुम्ही विचार केला आहे का?
आझम खान : विचार करण्यासारखे काही नाही. ते आल्यानंतर मला आनंदच होईल. माझी आणि त्यांची ही काही पहिलीच भेट नाही. माझ्या शरीरावर आणि आत्म्यावर अखिलेश यादव यांचाच हक्क आहे. मला भेटण्यासाठी फक्त त्यांनीच यावे, अशी माझी इच्छा आहे.
प्रश्न : तुम्ही फक्त अखिलेश यादव यांनाच का भेटणार? इतरांना का नाही?
आझम खान : काहीही झाले तरी मी फक्त अखिलेश यादव यांनाच भेट देईन. इतरांना भेटण्यास मी फार उत्सुक नाही. तुरुंगात असताना माझ्या कुटुंबाची विचारपूस कोणी केली? ईदच्या दिवशी माझी पत्नी एकटी बसून रडत होती. कोणी आले का? कोणाचा फोन आला का? मग आता ते कशाला यावेत?
प्रश्न : अखिलेश यादव यांनी त्या काळात तुम्हाला फोन केला होता का?
आझम खान : त्या काळात आमचे फोन आणि सगळे संपर्क बंद होते. त्यामुळे… ही भेट फक्त दोन व्यक्तींमधली असेल. तिसऱ्यासाठी जागा नाही; मग ते कोणीही असोत.
प्रश्न : यापुढे समाजवादी पक्षात तुमची भूमिका काय असेल?
आझम खान : मी पक्षातील नेत्यांच्या रांगेत अगदी शेवटी उभा राहीन. कारण- जो शेवटी उभा असतो, तोच सगळ्यांना दिसतो. पुढे जाण्यासाठी अनेक जण धावतील; पण मागे उभा राहिलेला दूरवरूनही स्पष्टपणे दिसतो. मी नेहमी शेवटी उभा राहिलो आहे आणि यापुढेही तिथेच राहीन.