Bidi GST Rate Kerala Congress post : ‘जीएसटी’ परिषदेने वस्तू आणि सेवा कर दररचनेत पूर्ण फेरबदल करण्यास मान्यता दिल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यादरम्यान केरळमधील काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे बिहारमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. भाजपानंही याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांना चांगलंच कोंडीत पकडलं आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून (राष्ट्रीय जनता दल) बिहारमधील जनतेचा नेहमीच अपमान केला जातो, असा आरोप केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी केला आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? केरळ काँग्रेसच्या पोस्टमुळे बिहारमध्ये वाद का निर्माण झाला? त्याबाबत जाणून घेऊ…
केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी जीएसटीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत काही जीवनाश्यक वस्तूंवरील करामध्ये कपात करण्यात आली. या निर्णयामुळे खाद्यपदार्थांसह काही जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत; तर सिगारेट आणि गुटखा यांसारख्या तंबाखूजन्य उत्पादनांच्या जीएसटी दरात वाढ केल्यामुळे त्यांच्या किमती वाढणार आहे. परंतु, विशेष बाब म्हणजे- केंद्र सरकारने विडीवरील जीएसटी दरातही कपात केली आहे. पूर्वी विडीवर आकारला जाणारा २८ टक्के दर आता १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्याशिवाय विडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेंदूपत्त्यांवरील जीएसटी दरातही १८% वरून ५% पर्यंत कपात करण्यात आली आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
केरळमधील काँग्रेस पक्षानं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये तंबाखू उत्पादनावरील जीएसटी कपातीचा हवाला देण्यात आला. ‘बिडी आणि बिहारची सुरुवात ‘बी’पासून होते आणि त्यावरील जीएसटी कमी केल्यामुळे ते पाप मानले जाऊ शकत नाहीत, असा मजकूर या पोस्टमध्ये लिहिण्यात आला होता. सदरील पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. भाजपाच्या नेत्यांनीही या पोस्टवर आक्षेप घेत, काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला. बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते सम्राट चौधरी यांनी याला संपूर्ण राज्याचा अपमान म्हटलं आहे.
आणखी वाचा : भाजपामधील घुसखोर नेत्यांमुळेच मित्रपक्षांना त्रास; एनडीएमध्ये फूट पडणार? संजय निषाद काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची काँग्रेसवर टीका
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान केल्यानंतर काँग्रेसनं आता बिहारमधील संपूर्ण जनतेचाही अपमान केला आहे. हाच त्यांचा खरा स्वभाव असून, तो पुन्हा पुन्हा देशासमोर उघड होत आहे”, अशी टीका सम्राट चौधरी यांनी केली. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनीही याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांना लक्ष्य केलं. “काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD) यांना बिहारमधील लोकांचा आणि त्यांच्या स्वाभिमानाचा अपमान करण्यात आनंद होतो. बिहारमधील जनता यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या प्रत्येकाला योग्य तो धडा शिकवतील,” असे राय म्हणाले. त्यांनी या पोस्टवरून राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.
जनता दल युनायडेटनेही घेतलं तोंडसुख
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाचे नेते संजय कुमार झा यांनीही काँग्रेसच्या पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला “मी तुम्हाला सांगू इच्छितो की- ‘बी’ चा अर्थ फक्त ‘बिडी’ नाही, तर ‘बुद्धी’ असा होतो, जी तुमच्याकडे नाही. ‘बी’ चा अर्थ ‘बजेट’ देखील होतो, जी बिहारला मिळाल्यानंतर तुम्हाला प्रचंड वेदना होत आहे”, असा टोला संजय झा यांनी लगावला. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्षांना बिहारमधील जनतेचा अपमान करण्यात नेहमीच आनंद होतो, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने पोस्ट डिलीट करून मागितली माफी
दरम्यान, बिडी आणि बिहारचा उल्लेख असलेल्या पोस्टमुळे वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसकडून ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. शुक्रवारी या पोस्टसंदर्भात विरोधी पक्षाकडून माफीही मागण्यात आली आहे. “बिहारमधील जनतेच्या भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढवला असताना विडीवरील जीएसटी दरात कपात का केली, असा प्रश्न आम्ही सत्ताधारी भाजपाला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पोस्टचा गैरअर्थ काढण्यात आला. तरीही त्यामुळे बिहारमधील जनतेच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, अशी पोस्ट केरळ काँग्रेसच्या वतीनं टाकण्यात आली आहे.
हेही वाचा : महायुतीसमोर मराठा आरक्षणाचा यक्षप्रश्न, राधाकृष्ण विखेंनी कसं शोधलं उत्तर?
बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस होणार निवडणूक
बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दलानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा काढली होती. या यात्रेतून त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित मतचोरीचा मुद्दा व निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार फेरतपासणी मोहिमेवर टीकेचा भडिमार केला. “निवडणूक आयोगाला हाताशी धरून, भाजपा बिहारमधील गरीब मतदारांकडून मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, आगामी निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना नक्कीच धडा शिकवणार”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते सरकारविरोधात अपप्रचार करीत असल्याचा दावा भाजपानं केला आहे.