Top Five Political News in Today : शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला, तर तुम्ही गोट्या खेळूनच दोनदा शपथविधी घेतल्याची टीका बच्चू कडूंनी अजित पवारांवर केली. ‘अस्मानी संकटाने खचून जाऊ नका कर्जमाफीची मागणी आम्हीही सरकारकडे करू’ असा धीर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आली आहे’ अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे केली. ‘नुकसानीचे सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल’ अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

कर्जमाफीची मागणी होताच अजित पवार संतापले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे धाराशिवमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी ते ग्रामस्थांशी संवाद साधत असताना एका शेतकऱ्याने सरसकट कर्जमाफीची मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. “आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का? सकाळी ६ वाजता मी पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला. मी एवढा जीव तोडून सांगतोय तेही जरा ऐका. मला अजून एका ठिकाणी जायचं आहे. तुमच्या अडचणी आम्हाला कळत आहेत. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत करतोय माहितीय का? दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांची मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफ केली, त्याचे २० हजार कोटी भरतोय. आम्ही काय झोपा काढल्या नाहीत,” असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

बच्चू कडूंनी घेतला अजित पवारांच्या विधानाचा समाचार

‘आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’ या अजित पवार यांच्या विधानाचा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी समाचार घेतला. तुम्ही गोट्या खेळूनच दोनदा शपथविधी घेतला, अशी टीका त्यांनी केली. “सरकारच्या तिजोरीत पैसे नसेल तर लाडक्या बहिणींना बदनाम कशाला करता. शक्तीपीठ महामार्गासाठी एवढा खर्च कशासाठी करता आहात. त्याचे काम दोन तीन वर्ष पुढे ढकलून द्या. मुंबईत स्मार्ट सिटीत पैसा गुंतवला. आता शेतकरी अडचणीत आल्यावर काय करणार. अजित पवार यांची दादागिरी सत्तेत राहण्यासाठीच आहे,” असे बच्चू कडू म्हणाले. “शेतकऱ्याचे जीवन कुत्र्या मांजरासारखे झाले असून ते जगले किंवा मेले तरी या सरकारला काही घेणे देणे नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. तरीही त्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही,” असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

आणखी वाचा : Visual Storytelling : ‘चोरी पकडली, तेव्हा कुठे…’ निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयावर राहुल गांधी काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. “आस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडेवाकडे पाऊल उचलू नका, हे माझे तुम्हा सगळ्या कळकळीचे आवाहन आहे. तुम्हाला सरकारकडून जी मदत तातडीने हवी आहे ती आम्ही मिळवून देऊ,” असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला. कर्जमाफीची आणि प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीचे मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत. सध्या सरकारला तातडीची मदत जाहीर करू द्या, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण पाहू,” असे माजी मुख्यमंत्री म्हणाले. पुढील दोन दिवसात उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आली’

अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सध्या विविध पक्षातील नेत्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी केली जात आहे. यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले. “योग्य वेळ येताच कर्जमाफीची घोषणा करू असे आश्वासन तुम्ही (देवेंद्र फडणवीस) दिले होते. आता ती वेळ आलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे”, असे आदित्य यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याशिवाय मदत करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. “माझ्या माहितीप्रमाणे याआधी शासनाकडे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची जवळपास १५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. या थकबाकीचे वितरण लवकरात लवकर यावे, असेही आदित्य यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : मुस्लीम उमेदवाराविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, पण… प्रशांत किशोर यांनी आरजेडीसमोर ठेवली अट

शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार : मुख्यमंत्री फडणवीस

अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील शेतातील पिके पाण्याखाली गेली. मराठवाड्यात एकूण ४८३ महसुली मंडळे असून, त्यापैकी ४५१ मंडळांत आत्तापर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले असून शेकडो जनावरे दगावली आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारमधील मंत्री विविध जिल्ह्याचा दौरा करीत आहेत. यावेळी सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत सरसकट मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली.