सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंडाळीनंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातील मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची सर्वबाजूने चोहुबाजूने कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) केली असली तरी यातून आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाठ हे टीका पिरघाच्या बाहेर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार शिरसाठ यांच्याऐवजी पालकमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांच्या नातेवाईकांची दारू दुकानेच शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेतही टीकेच्या केंद्रस्थानी होती. सुषमा अंधारे व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पालकमंत्री भुमरे यांच्या दारु दुकानांची जाहीर सभेत नावेच सांगितली. आमदार संजय शिरसाठ यांना ‘ समाज कल्याण ’ मंत्री पदाची आस होती. पण ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याऐवजी त्यांना अनुल्लेखाने टीका पिरघातून राखून ठेवले जात आहे.

हेही वाचा: काँग्रेसच्या पारंपारिक आदिवासी मतदारांना राहुल गांधी यांची साद

जिल्ह्यातील बहुतांश आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक बनल्याने औरंगाबाद जिल्ह्यात वारंवार मेळावे घेऊन शिवसेनेकडून बांधणी केली जात आहे. शिवसेना सोडून जाणाऱ्यांची अवस्था वाईट होते, हे आवर्जून सांगितले जात असून मंत्री संदीपान भुमरे यांच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या मद्यविक्रीच्या परवान्यावरुन आदित्य ठाकरे यांनीही टीका केली होती. दिवाळी दरम्यान ‘आनंद शिधा’ देताना भुमरे यांचे छायाचित्र त्यावर नव्हते. म्हणूनही ते नाराज असल्याचेही शिसेनेकडून सांगण्यात येत होते. आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्यावर वैजापूर मतदारसंघात शिवसेनेकडून टीका करण्यात आली.

हेही वाचा: मंत्रिपदाची चर्चा अन् समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर मुख्यमंत्री शिंदे यांची मेहरनजर

उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर पत्र लिहून टीका करणारे संजय शिरसाठ हे मात्र टीकेच्या केंद्रस्थानी नाहीत. आमदार जैस्वाल हेही टीकेच्या परिघाबाहेरच असतात. विशेष म्हणजे ठाकरे, आदित्य ठाकरे व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्यावर आमदार जैस्वालही फारसे बोलत नाहीत. कृषीमंत्री सत्तार हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असल्याने त्यांच्यावर सर्वपक्षीय टीका होते. शिवसेनेकडूनही मंत्री सत्तार यांच्यावर टीका तर होते पण सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेला अद्यापि फारसे हातपाय मारता आले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सिल्लोडमध्ये शिवसेनेकडून कोण उमेदवार असू शकेल याची चापपणी करता येईल. तूर्तास या मतदारसंघात तुल्यबळ लढत देईल असा कार्यकर्ता नजरेच्या टप्प्यात येत नाही, असे शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्यानेही मान्य केले. राजकीय गोळा बेरजेत पालकमंत्र्याभोवतील रिंगण आखले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasahebanchi shiv sena targets in guardian minister sandipan bhumre aurangabad print politics news tmb 01
First published on: 21-11-2022 at 15:44 IST