बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर बारामतीतील मतदार हे नगरपरिषदेच्या माध्यमातून तिसऱ्यांदा मतदान करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेवर यापूर्वी तत्कालीन ‘राष्ट्रवादी’ने सत्ता मिळवली होती. आता ‘राष्ट्रवादी’ दुभंगल्याने बारामतीकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) की राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला साथ देणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर बारामतीकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते. आता नगरपरिषदेच्या माध्यमातून तिसऱ्यांदा हे मतदार मतदान करणार आहेत. लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांना मतदारांनी साथ दिली. विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने मतदार राहिले. नगरपरिषदेची निवडणूक ही स्थानिक पातळीवर असल्याने चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीत नगराध्यक्ष आणि ३९ नगरसेवक होते. त्यांपैकी नगराध्यक्ष आणि ३५ नगरसेवक हे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होेते. उर्वरित चार जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. त्या वेळी भाजप, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, अपक्ष निवडणूक रिंगणात होते. विजयी झालेल्या चार नगरसेवकांनी निवडणुकीनंतर एकत्र येत ‘बारामती विकास आघाडी’ स्थापन करून विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते.
बदललेल्या राजकीय स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडे ३३ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आणि एक नगरसेवक आहे. मात्र, ही स्थानिक पातळीवरील निवडणूक असल्याने मतदारांचा कल कोणाकडे असणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
प्रभागांत वाढ
यंदा बारामती नगरपरिषदेचा एक प्रभाग वाढला आहे. त्यामुळे दोन जागा वाढल्या आहेत. १ ते १९ या प्रभागांतून प्रत्येकी दोन, तर क्रमांक २० च्या प्रभागात तीन सदस्य असतील. यंदा ४१ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे ४२ जण नगरपरिषदेत निवडून दिले जाणार आहेत. निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकांना संधी दिली जाते. त्या संख्येत मात्र बदल झालेला नसून चार जणांना संधी मिळणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची गर्दी
आरक्षण सोडतीत नगराध्यक्ष हे पद खुल्या गटासाठी निश्चित झाले आहे. २०१६ ते २०२२ ही पाच वर्षे नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव होते. आता हे पद खुल्या गटासाठी राखीव झाल्याने या पदासाठी इच्छुकांची गर्दी असणार आहे.
