पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांच्याकडे तब्बल ७२ कोटी रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. त्यांच्यावर २२ कोटींचे कर्ज असून, त्यामध्ये वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून ६ कोटी ८२ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे.

प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे, युगेंद्र पवार यांच्या नावे शरयू सिक्युरिटी सर्व्हिस प्रा. लि. आणि देवगिरी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ५० टक्के भागीदारी तत्त्वावर मालकत्व असून, त्यांच्याकडे ३९ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम आहे. विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांच्या खात्यांत मिळून तब्बल ३९ कोटी ७९ लाख ९४ हजार २९ रुपयांच्या ठेवी आहेत. मुळशी तालुक्यात नऊ वेगवेगळे जमिनीचे तुकडे मिळून तब्बल ७ एकर जमीन आहे. बारामती तालुक्यातील सोनेगाव येथे १.९७ एकर, काटेवाडीमध्ये पावणेतीन एकर अशी एकूण दोन कोटी ३६ लाख ८० हजार ९५१ रुपये किमतीचे १३ एकर क्षेत्रफळ असलेली शेतजमीन आहे.

हेही वाचा : आता प्रचाराची रणधुमाळी, पुणे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट; बहुतांश लढती चुरशीच्या

मुंबईमध्ये मलबार हिल येथे १० कोटी ७९ लाख ५५ हजार रुपयांची सदनिका अशी एकूण ७२ कोटी ७७ लाख रुपयांची स्थावर, जंगम मालमत्ता जाहीर करण्यात आली आहे. तर, दोन कोटी ९३ लाख ४७ हजार ६१७ रुपयांच्या बँक खात्यात ठेवी असून, ३१ कोटी ८२ लाख १२ हजार ९२० रुपयांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आहे. एक हार्वेस्टर, दोन ट्रॅक्टर, दोन मालवाहतूक वाहने आणि इतर संपत्तीचा तपशीलही प्रतिज्ञापत्रात आहे.

हेही वाचा : सिंचन घोटाळाप्रकरणी आर. आर. पाटलांनी फसवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडील श्रीनिवास यांच्याकडून पावणेसात कोटींचे कर्ज!

युगेंद्र यांची स्वत:ची शेतजमीन असून, त्यांनी शेतीसाठी एक कोटी ९३ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. घरासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून आठ कोटी २७ लाख ४३ हजार ९९४ रुपये, हार्वेस्टिंग मशिनसाठी ९९ लाख ७७ हजार ६१७ रुपये, मोरेश्वर ट्रेडिंग १८ लाख ७० हजार १२५ रुपये, श्री योग अॅग्रो एलएलपी कंपनीकडून पाच कोटी ६० लाख रुपये, वायएम मोटर्स ९१ लाख ७० हजार ३५० रुपये असा कर्जाचा तपशील नमूद आहे. यामध्ये युगेंद्र यांनी वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून ६ कोटी ८२ लाख ४० हजार ४३२ रुपयांच्या कर्जाचा उल्लेख करून एकूण २२ कोटी ८० लाख २ हजार ५१८ रुपयांचे कर्जरूपी देणी असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.