महेश सरलष्कर

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नव्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवार व रविवारी हैदराबादमध्ये होत आहे. १७ सप्टेंबर रोजी सोनिया गांधींच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेतून काँग्रेसच्या तेलंगणासह पाचही राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होईल.

मध्य प्रदेशमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भोपाळमध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ची पहिली संयुक्त सभा होणार आहे. यावेळी तिथे निवडणूक सोपी नसल्याचा ‘संदेश’ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून भाजपने दिला आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंकडे नेतृत्व न देण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला तर, कदाचित इहीथे काँग्रेसचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असले तरी, सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसला मतदारांपर्यंत पोहोचावे लागेल. उत्तरेकडील तीनही राज्यांतील प्रचाराच्या अजेंड्यावर १७ आणि १८ सप्टेंबरच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकेल.

आणखी वाचा-राष्ट्रवादीतील वाद आणि कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद

गेल्या वर्षी दक्षिणेकडील पाचही राज्यांमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सर्वाधिक प्रतिसाद कर्नाटकमध्ये दिसला, तिथे काँग्रेसने सत्ता काबीज केली. ‘भारत जोडो’ यात्रेत तेलंगणामध्ये विशेषतः हैदराबादमध्ये लोकांनी गर्दी केली होती. इथेही ‘भारत जोडो’च्या यशाचा लाभ विधानसभा निवडणुकीत होण्याची काँग्रेसला आशा वाटते. काँग्रेसने नव्या कार्यकारिणी समितीची पहिली बैठक हैदराबादमध्ये आयोजित करून वातावरण निर्मिती केली आहे. २०१८च्या निवडणुकीत कुठेही न दिसलेल्या काँग्रेसने यावेळी सत्ताधारी ‘भारत राष्ट्र समिती’समोर आव्हान उभे केले आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाले, हा दिवस आता ‘तेलंगणा राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा होणार आहे. त्यामुळे शनिवारी सोनिया गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थिती भाजप आणि केसीआर यांचा ‘भारत राष्ट्र समिती’ या तीनही पक्षांच्या जाहीरसभा होतील.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा निश्चित केली जाईल. भोपाळच्या ‘इंडिया’च्या संयुक्त सभेत महागाई, बेरोजगारी, भाजप सरकारचा भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांभोवती प्रचार केला जाणार असल्याचे काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा प्रचार देखील कर्नाटकप्रमाणे स्थानिक मुद्द्यांपुरता सीमित ठेवला जाण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील मुद्द्यांचाही आढावा कार्यकारिणीमध्ये घेतला जाऊ शकतो. सनातन धर्म आदी वादग्रस्त विषयांवर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असून पक्षाअंतर्गत सल्लामसलतून त्यातून वाट काढावी लागेल. पक्षाध्यक्ष खरगेंचे पुत्र व कर्नाटकमधील मंत्री प्रियंक खरगे यांनी सनातनच्या मुद्द्यावर ‘द्रमुक’च्या उदयनिधी यांना जाहीर पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेणे टाळले.

आणखी वाचा-आंध्र प्रदेश : जगन मोहन रेड्डी यांच्या पराभवासाठी टीडीपी-जेएसपी एकत्र, भाजपालाही युतीत सामील होण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षाध्यक्ष खरगे यांनी नव्या कार्यकारिणीमध्ये अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्य, महिला व युवा अशा विविध समाजघटकांचा समावेश केला असल्याने या सदस्यांसाठी अजेंडा तयार केला जाऊ शकतो. काँग्रेसने जातनिहाय जनगणनेची मागणी केली असून ओबीसींना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतील. ‘भारत जोडो’ यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा विचार केला जात आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबरपासून पूर्व-पश्चिम यात्रा काढण्यासंदर्भात पक्षाअंतर्गत चर्चा होत असली तरी, विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावर अधिक लक्ष केंद्रीय करावे लागणार आहे. अशावेळी यात्रा काढली तर पक्षनेते-कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित होईल. त्यापेक्षा डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर आसामापासून गुजरातपर्यंत ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा पूर्ण केला तर, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लाभ मिळू शकतो असा वेगळा विचारही मांडला जात आहे.