छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील भाजपअंतर्गत मंडळाध्यक्षांच्या निवडी अखेर जाहीर झाल्या आहेत. मात्र, या निवडीत भाजप आमदार सुरेश धस यांच्या विधानसभा मतदारसंघातील कडा, आष्टी, पाटोदा व शिरूर कासार येथील मंडळाध्यक्षांच्या निवडी बाकी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामागे पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस यांच्यातील वादाची किनार असल्याचे मानले जात आहे. उर्वरीत मंडळाध्यक्ष निवडीवर पंकजा मुंडे यांचा वरचष्मा दिसून येत आहे. तर आमदार धस मात्र, त्यांच्या आष्टी-पाटोदा विधानसभा मतदारसंघात स्वत:च्या विश्वासू कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.
बीड जिल्ह्यातील भाजपचे दोन नेते पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्यातील वादाने टोक गाठले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीपासून दोघांमधील विसंवादाला जाहीरपणे सुरुवात झाली. पंकजा मुंडे या आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या जाणकार असून, त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नावर काही विचारू नका, अशा शब्दांमध्ये सुरेश धस यांनी त्यांना लक्ष्य केले होते. तर आमदार धस यांना समज द्यावी, अन्यथा केंद्रीय पातळीपर्यंत आपण त्यांची तक्रार करू, असा थेट इशाराच पंकजा मुंडे यांनी राज्यातील वरिष्ठांना दिला होता. दोघांनीही परस्परांवर केलेली टीका राज्यभर चर्चेत आली होती.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना पंकजा मुंडे, सुरेश धस हे दोघेही एकाच व्यासपीठावर असताना त्यांच्यामध्ये संवाद झाला नाही. यापूर्वीही आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचे नाव नव्हते. मात्र, त्यानंतरही पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. राजकीय शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर दोघांनीही परस्परांच्या नावांचा भाषणात उल्लेख केला असला तरी त्यांच्यातील वादाचा विचार बीड जिल्ह्यातील मंडळाध्यक्षांच्या निवड यादीवरूनही दिसून येत आहे.
परळीला २२ वर्षांनी मंडळाध्यक्ष
परळी शहराच्या नूतन मंडळाध्यक्षपदी उमा रामशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी २००३ मध्ये जुगलकिशोर लोहिया यांची भाजप शहराध्यक्ष निवड झाली होती. उमा रामशेट्टी यांच्या रुपाने परळीतील भाजपच्या इतिहासात प्रथमच मंडळाध्यक्षपदाचा (शहराध्यक्ष) मान महिलेला मिळाला आहे. तर परळी ग्रामीण पूर्वसाठी राजेश गित्ते व पश्चिमसाठी वसंत निर्मळ यांची नियुक्ती झाली आहे. राजेश गित्ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. वैद्यनाथ कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात दोनच महिला मंडळाध्यक्षा असून, त्यात परळीच्या उमा रामशेट्टी तर माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील रुपाली कचरे यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात नव्या रचनेत नऊ मंडळांची वाढ झाली आहे. पूर्वी १५ मंडळे होती. आता नवीन रचनेत २४ मंडळे झाली आहेत. २० मंडळांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. कडा, आष्टी, पाटोदा व शिरूर या मंडळातील नियुक्त्याही लवकरच होतील. जिल्ह्यात ऑनलाईन व ऑफलाईन मिळून २ लाख १० हजार सदस्य नोंदणी झाली आहे. तर १ हजार ६७५ सक्रिय सदस्य आहेत. १ हजार २९५ बुथ समित्या झाल्या आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.शंकर देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप.