काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी याने काल (दि. ६ एप्रिल) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अनिल अँटनी याच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला केरळमधील ख्रिश्चन समुदायाच्या आणखी जवळ जाण्याची एक संधी यामुळे मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा ख्रिश्चन समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी झटत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल अँटनी यांचा पक्षप्रवेश भाजपाला सुखावणारा आहे. मात्र दुसरीकडे केरळचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी या पक्षप्रवेशानंतर दुःख व्यक्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल अँटनीने काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याची चाचपणी सुरू केली. मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनिल अँटनीच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आणि त्यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिरुअनंतपुरम येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझ्या मुलाचा निर्णय वेदनादायी आहे. मी मरेपर्यंत काँग्रेसी राहिल. मी सध्या ८२ वर्षांचा असून आयुष्याच्या उत्तरकाळात आहे. यापुढील आयुष्य कसे काढू? असा प्रश्न माझ्यासमोर आहे. अनिलने जानेवारी महिन्यात पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्याशी मी फार काही बोललेलो नाही. या विषयावर ही माझी पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया आहे.”

हे वाचा >> मुलाच्या भाजपा प्रवेशावर ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांची पहिली प्रतिक्रिया, भावूक होत म्हणाले, “त्यांनी पद्धतशीरपणे…”

भाजपाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही. मुरलीधरन, केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन, ज्येष्ठ नेते तरुण चुघ आणि अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात ३७ वर्षीय अनिल अँटनी यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. केरळमध्ये पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी भाजपा आणि संघाकडून गेले अनेक वर्षं प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून संघाकडून ख्रिश्चन समाजाशी संवाद साधण्यासाठी जिल्हापातळीवर यंत्रणा उभी करण्यात आली आहे. तसेच भाजपानेही ख्रिश्चन समाजापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले. केरळमध्ये सत्ता संपादन करणे किंवा लोकसभेच्या जागेत वाढ करण्यासाठी ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा आवश्यक आहे.

कर्नाटकमध्ये भाजपाला काँग्रेसकडून कडवी झुंज दिली जात आहे. कर्नाटकातही ख्रिश्चन समुदाय आणि चर्चच्या नेतृत्वाचा समाजमनावर मोठा पगडा आहे. अनिल अँटनीच्या प्रवेशामुळे महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. ख्रिश्चन समुदायातील युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनिल अँटनी यांना पुढे केले जाऊ शकते. केरळमधील ख्रिश्चन समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आतापर्यंत माजी मंत्री के. जी. अल्फोन्स, काँग्रेसचे माजी प्रवक्ते टॉम वडक्कन यांना भाजपाने पक्षात घेतले होते. यांच्या प्रवेशामुळे ख्रिश्चन समाजाचा थोडाबहुत पाठिंबा मिळाला असला तरी त्याचा निवडणुकीच्या निकालात काही लाभ झालेला नाही.

प्रकाश जावडेकरांचे पक्ष संघटना वाढविण्याचे प्रयत्न

इस्लामिक कट्टरतावादाच्या विरोधात आवाज उठवून केरळमध्ये प्रभावशाली असलेल्या ख्रिश्चन समाजाला आपल्या बाजूने वळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. नजीकच्या काळात काँग्रेस पक्षातून काही शक्तिशाली काँग्रेस नेते बाहेर पडल्यानंतर भाजपाने ही संधी हेरून या नेत्यांसाठी आपले दारे खुली केली. माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर केरळ राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जावडेकर हे विविध समाजाच्या बैठका घेत आहेत. तसेच त्यांनी अनेक ख्रिश्चन नेत्यांशी संवाद सुरू केल्यापासून त्यांना पक्षात खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हे वाचा >> केरळमधील चर्च भाजपाला पाठिंबा देण्यासाठी तयार; केंद्र सरकारसमोर ठेवली महत्त्वाची अट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत नव्या समाजघटकांना पक्षासोबत जोडून घेण्याचे आवाहन केले होते. त्याच धर्तीवर केरळमध्ये ख्रिश्चन समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. नुकत्याच ईशान्य भारतात झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले. मेघालय आणि नागालॅण्डचे निकाल हे सिद्ध करतात की, भाजपा ख्रिश्चन समाजाच्या विरोधात नाही, असे वक्तव्य मोदी यांनी केले होते. जर या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळू शकते तर केरळमध्येही प्रदेश पक्षांना एकत्र घेऊन भाजपा सत्तेत येऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली होती.

वडिलांप्रति माझा आदर तसाच राहील – अनिल

तिरुअनंतपुरम येथे माध्यमांशी बोलताना ए. के. अँटनी म्हणाले की, आपल्या भारत राष्ट्राचा मुख्य आधार म्हणजे आपली एकता आणि धार्मिक सलोखा आहे. परंतु २०१४ नंतर मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ते (भाजपा) पद्धतशीरपणे देशाच्या विविधतेचे आणि धर्मनिरपेक्षतेचे नुकसान करीत आहे. ते केवळ एकसमानतेवर विश्वास ठेवतात. ते देशाच्या संवैधानिक मूल्यांना उद्ध्वस्त करीत आहेत. अनिल अँटनी यांना त्यांच्या वडिलांच्या प्रतिक्रियेबाबत दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हा विषय दोन व्यक्तिमत्त्वांचा नाही. हा विषय दोन व्यक्तींच्या विचार आणि संकल्पनेमध्ये असलेल्या फरकाचा आहे. मी घेतलेला निर्णय योग्य आहे, हे मी पूर्ण खात्रीशीर सांगू शकतो. माझ्या वडिलांप्रति असलेला माझा आदर यामुळे कमी होणार नाही.

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा विरोध करून अनिलने देशहित साधले – गोयल

अनिल अँटनी यांनी जानेवारी महिन्यात बीबीसी डॉक्युमेंट्रीवर घेतलेल्या भूमिकेची स्तुती भाजपा नेत्यांनी केली. अनिल अँटनी यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असून ते केरळ आणि भारताच्या भविष्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे नेते म्हणून पुढे येतील, असा विश्वास भाजपाचे नेते व्यक्त करतात. पीयूष गोयल यांनी गुजरात दंगलीवर आधारित असलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर कडाडून आक्षेप घेतला होता. “ही डॉक्युमेंट्री बिनबुडाचे निराधार आरोप करणारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठीच त्याची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनिल अँटनी यांनी हा भारताच्या अखंडता आणि सार्वभौमत्वाला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले होते. त्यांचे हे विधान काँग्रेसला निश्चितच आवडले नाही. त्याच वेळी काँग्रेसचे नेते मात्र ब्रिटिशभूमीवर जाऊन भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करीत होते,” अशी प्रतिक्रिया पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आणखी वाचा >> केरळमध्ये संघाचा ख्रिश्चनांशी संवाद, तर मुस्लिमांशीही चर्चा करण्यास तयार

ए.के.अँटनीचा मुलगा एवढीच अनिलची ओळख

अनिल यांच्या निर्णयाबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सुधारकरन म्हणाले, “अनिलने काँग्रेससोबत गद्दारी केली. ते जुडास इसकॅरिएट (Judas Iscariot) (बायबलमधील एक पात्र) आहेत. ज्याने फक्त तीस चांदीच्या नाण्यांसाठी प्रभू येशूला दगा दिला. आजच्या दिवशी (गुड फ्रायडेचा आधीचा गुरुवार) जुडासने दगा दिला होता. अनिल अँटनीचा भाजपामधील आजचा प्रवेश हा त्या घटनेची पुन्हा एकदा आठवण करून देणार आहे. अनिलने फक्त काँग्रेसलाच नाही तर स्वतःच्या जन्मदात्या वडिलांनाही दगा दिला आहे. तसेच अनिल अँटनीला भाजपात महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळणार नाही. ए.के.अँटनी यांचा मुलगा याखेरीज त्याची काहीही ओळख नाही. त्याने कधी काँग्रेससाठी घोषणा दिलेल्या नाहीत किंवा काँग्रेसचा झेंडा खांद्यावर मिरवलेला नाही. पक्षासाठी आजवर त्याने काहीच काम केलेले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Behind anil antony jumping ship bjps push for christian outreach in kerala father ak antony hurts kvg
First published on: 07-04-2023 at 14:13 IST