आज दिवसभरातील राजकीय घडामोडी : बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी ठाकरे गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कणकवलीत महायुतीतील वाद विकोपाला गेल्याने भाजपाने बॅनरवरून शिंदेसेनेचे फोटो हटवले. कोल्हापूरमधील चंदगड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गट एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
उद्धव ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटात
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी ठाकरेंना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर सामंत यांनी आपल्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. ‘बेस्टच्या पतपेढीची निवडणूक हरलो, म्हणून माझा बळी दिला. मला राजीनामा द्यायला लावला, असा आरोप सामंत यांनी यावेळी केला. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षात मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपाच्या बॅनरवरून शिंदेसेना गायब
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीत वाद निर्माण झाला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीआधी महायुतीमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपाच्या शहर कार्यालयासमोर लावलेल्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे, सोमवारी भाजपा शहर कार्यालयासमोर झळकलेल्या बॅनरवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे फोटो होते. मात्र, मंगळवारी याच ठिकाणी झळकलेल्या नव्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या बदलामुळे कणकवलीत महायुतीच्या भवितव्याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
आणखी वाचा : Maharashtra Politics : अजित पवारांची चोहोबाजूने कोंडी; भाजपाला मोठा फायदा? महायुतीमध्ये काय घडतंय?
भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे; तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुलरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
चंदगडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र; भाजपाला शह
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत भाजपाला शह दिला आहे. चंदगड विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अजितदादा गटाचे तत्कालीन आमदार राजेश पाटील यांचा पराभव करून अपक्ष शिवाजी पाटील विजयी झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे त्यांनी भाजपचे समर्थक आमदार अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी दौलत कारखाना चालवायला घेतलेले मानसिंग खोराटे व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी तथा विनायक पाटील यांची एकत्रित मोट बांधली आहे. त्यातून त्यांनी महायुतीचे राजेश पाटील यांना खो दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांना नेमकं कोण अडचणीत आणतंय? पवार कुटुंबियांची भूमिका काय?
शिवसेना पक्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी रडखडलेली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कोर्टाचा निकाल यावा यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू होते. मात्र आता या खटल्याची अंतिम सुनावणी थेट पुढच्या वर्षीच होणार आहे. येत्या २१ जानेवारी २०२६ रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
