Bihar Chief Secretary appointment बिहार सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवपदी बिहारचे विकास आयुक्त प्रत्यय अमृत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना राज्यातील रस्त्यांची स्थिती आणि वीजपुरवठा सुधारण्याचे श्रेय दिले जाते. त्यांच्या नियुक्तीची माहिती सोमवारी एका अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली. ३१ ऑगस्ट रोजी अमृत लाल मीना निवृत्त होणार असून, प्रत्यय अमृत त्यांचा पदभार स्वीकारतील. कोण आहेत प्रत्यय अमृत? त्यांच्या नियुक्तीचे महत्त्व काय? बिहार सरकारने इतक्या तडकाफडकी त्यांच्या नियुक्तीचा निर्णय का घेतला? जाणून घेऊयात.

अधिसूचनेत नक्की काय सांगण्यात आले आहे?

सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. राजिंदर यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, “प्रत्यय अमृत हे विकास आयुक्त असून, ते आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. त्यांची आता बदली करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अमृत लाल मीना यांच्या ३१ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांची १ सप्टेंबर २०२५ पासून मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.” आपल्या कारकिर्दीत प्रत्यय अमृत यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते आर. के. सिंह (माजी केंद्रीय मंत्री) आणि अमीर सुभानी (माजी मुख्य सचिव) प्रत्यय अमृत यांसारख्या प्रमुख आयएएस अधिकाऱ्यांना सुशासन आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

प्रत्यय अमृत यांनी आधी रस्ते बांधकाम विभागाचे सचिव म्हणून आणि नंतर ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रत्यय अमृत यांनी बिहारमध्ये अनेक मोठे रस्ते बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यात राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी गंगा पथ आणि एम्स-दिघा उड्डाणपूल यांचा समावेश आहे. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राज्यातील प्रत्येक गावात वीजपुरवठा पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०११ मध्ये लोकप्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार मिळविणारे ते एकमेव आयएएस अधिकारी होते. ते १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

२०२१ मध्ये कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, त्यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला. तसेच नवीन प्रकरणांचा वाढता वेग आणि विषाणूचा प्रसार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या वर्षाच्या शेवटी राज्यात निवडणुका होणार असल्यामुळे बिहारच्या मुख्य सचिवपदी प्रत्यय अमृत यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

प्रमुख विभागांचे कार्यभार

प्रत्यय अमृत या नियुक्तीपूर्वी विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा अतिरिक्त कार्यभारही होता. त्यांची ही नवीन भूमिका प्रशासकीय व्यवस्थेत, विशेषतः या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची असणार आहे. ते त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरचे घनिष्ठ संबंध यासाठीही ते ओळखले जातात. अमृत यांनी राज्य आणि केंद्र सरकार दोन्हीमध्ये प्रभावशाली कारकीर्द घडवली आहे.

कोण आहेत प्रत्यय अमृत?

मुझफ्फरपूरचे मूळ रहिवासी असलेले अमृत यांनी कटिहार आणि सारण यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी (DM) म्हणून काम केले आहे. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आरोग्य सेवेत आणि सिमडेगा व छपरा या जिल्ह्यांमध्ये बेकायदा कामांवर कठोर कारवाई केली आणि यामुळे त्यांची ओळख निर्माण केली. ते दमका येथे त्यांच्या आयएएस प्रोबेशनदरम्यान संथाली ही आदिवासी भाषा शिकले. त्यातून त्यांची सांस्कृतिक समावेशकता आणि स्थानिक लोकांशी असणारी बांधिलकी दिसून येते.

निष्ठा आणि नावीन्यपूर्णता

आयएएस अमृत यांनी सिमडेगा (तत्कालीन बिहार, आता झारखंडमध्ये)मधील उपविभागीय दंडाधिकारी म्हणून दुर्गम आदिवासी भागांमध्ये जुगाराला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांनी २००१ ते २००६ या काळात नवी दिल्ली येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवरही काम केले. त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ते स्वेच्छेने बिहारमध्ये परत आले आणि त्यांनी राज्याच्या विकासासाठी योगदान दिले. २०११ मध्ये त्यांना ‘उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी पंतप्रधानांचा पुरस्कार’ मिळाला आणि हा पुरस्कार मिळविणारे ते देशातील एकमेव आयएएस अधिकारी ठरले. बिहार राज्य पूल निर्माण महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केलेल्या त्यांच्या अग्रगण्य प्रयत्नांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुख्य म्हणजे ते नवी दिल्ली येथील ‘व्हिजन इंडिया फाऊंडेशन’ या थिंक टँकमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील त्यांची वर्गमैत्रीण असलेल्या रत्ना यांच्याशी विवाह केला आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. आगामी निवडणुकीच्या काळात मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे प्रत्यय अमृत बिहारमध्ये कार्यक्षम व पारदर्शक प्रशासकीय वातावरण सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे. शासन, सार्वजनिक सेवा सुधारणा व संकट व्यवस्थापन यांतील त्यांचा अनुभव या टप्प्यात राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही सांगितले जात आहे.