BJP Defeat in Gujarat Visavadar Bypoll : महाराष्ट्र आणि हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाला आता त्यांच्याच सत्ताकेंद्रात पराभवाचा धक्का बसला आहे. गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार किरीट पटेल यांचा तब्बल १७ हजार मताधिक्याने पराभव झाला आहे. या जागेवर आम आदमी पार्टीचे उमेदवार गोपाल इटालिया विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, २०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत विसावदर मतदारसंघात आपच्याच उमेदवाराचा विजय झाला होता. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्याने या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. दरम्यान, गुजरातमध्ये भाजपा उमेदवाराचा पराभव कशामुळे झाला? आपच्या विजयामागची कारणे कोणती? याबाबत जाणून घेऊ…

गेल्यावर्षी झालेल्या हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या भाजपाने यावर्षीच्या सुरुवातीला दिल्लीच्या निवडणुकीतही अभूतपूर्व यश मिळवलं. विधानसभेच्या ९० पैकी तब्बल ४८ जागा जिंकून भाजपाने राजधानीत तब्बल २७ वर्षानंतर बहुमताने सत्तास्थापन केली. तर गेल्या दशकभरापासून दिल्लीवर एकहाती वर्चस्व ठेवणाऱ्या आम आदमी पार्टीला या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. विशेष बाब म्हणजे, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.

आमदाराने राजीनामा देऊन केला होता भाजपात प्रवेश

दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. एकेकाळी भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या विसावदर विधानसभा मतदारसंघात आपच्या उमेदवाराचा तब्बल १७ हजार मताधिक्याने विजय झाला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर आपचे उमेदवार भूपेंद्रभाई भायाणी हे विजयी झाले होते. मात्र, गेल्यावर्षी त्यांनी आपला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली. भाजपाने भूपेंद्रभाई यांना उमेदवारी न देता त्यांच्याजागी किरीट पटेल यांना विधानसभेचं तिकीट दिलं. तर आम आदमी पार्टीने माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते.

आणखी वाचा : BJP MLAs Suspended : भाजपाच्या ४ आमदारांचं तडकाफडकी निलंबन; विधानसभेत नेमकं काय घडलं?

गुजरातमध्ये ‘आप’च्या विजयाची काय आहेत कारणे?

  • आम आदमी पक्षाने या पोटनिवडणुकीत पंजाबचा फॉर्म्युला वापरला आणि निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांनी उमेदवाराची घोषणा केली.
  • दुसरीकडे, भाजपामध्ये मात्र, उमेदवारीसाठी शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता. मात्र, आम आदमी पक्ष जोरदार प्रचार करीत होता.
  • गुजरातमधील ही जागा वाचवण्यासाठी आम आदमी पक्षाने त्यांच्या पक्षातील लोकप्रिय चेहऱ्याला तिकिट दिले.
  • गोपाल इटालिया या मतदारसंघातील रहिवासी नाहीत, परंतु त्यांनी पूर्ण विधानसभा मतदारसंघात त्यांनी २-३ दौरे करून मतदारांमध्ये त्यांचा जम बसवला.
  • दुसरीकडे, भाजपाने ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यामुळे किरीट पटेल यांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले, परिणामी ते पिछाडीवर दिसून आले.
  • गोपाल इटालिया यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अरविंद केजरीवाल पोहचले होते. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे सांगितले की इटालिया हे भाजपात गेले तर मी राजकारण सोडेन.
  • केजरीवालांच्या या विधानामुळे विसावदर मतदारसंघातील मतदारांचा गोपाल इटालिया यांच्यावर विश्वास बसला आणि त्यांनी आपच्या पारड्यात भरभरून मते टाकली.
  • पत्रकारितेतून आम आदमी पार्टीत सामील झालेले इसुदान गढवी यांनी या पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्षाची भूमिका अत्यंत जबाबदारी निभावली. त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला.
  • गोपाल इटालिया यांनी राज्यासह मतदारसंघातील प्रश्न जनतेसमोर मांडले आणि सत्ताधारी भाजपाची गोची करून ते या निवडणुकीत १७ हजार मताधिक्याने विजयी झाले.
bjp defeat in gujarat aam aadmi party win (PTI Photo)
गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचा १७ हजार मतांनी विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला (छायाचित्र पीटीआय)

केजरीवालांच्या व्यूहरचनेमुळे भाजपाचा पराभव

पोटनिवडणुकीवेळी भाजपाच्या मंत्र्यांसह राज्यातील अनेक नेते विसावदर मतदारसंघात तळ ठोकून होते, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीत विजय मिळेल असे अंदाज बांधले जात होते. परंतु, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आखलेली व्यूहरचना विसावदरमध्ये भाजपाच्या पराभवाचे कारण बनली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये किरीट पटेल यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर गोपाल इटालिया आघाडीवर आले आणि त्यांनी घेतलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत तोडण्यास पटेल यांना अपयश आले. शेवटच्या फेरी संपल्यानंतर गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळाली, तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८ हजार ३२५ मते घेतली. याशिवाय काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली.

हेही वाचा : Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ठाकरे सरकार? राजकीय वर्तुळात का होतेय चर्चा?

केजरीवाल म्हणतात – गुजरातची जनता भाजपला कंटाळली

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले, “गुजरातमधील विसावदर मतदारसंघ आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या दमदार विजयाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. दोन्ही ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत विजयाचे अंतर जवळजवळ दुप्पट झाले आहे. यावरून असे दिसून येते की, पंजाबमधील जनता आमच्या सरकारच्या कामावर खूप खूश आहे. तर गुजरातमधील जनता आता भाजपाला कंटाळली आहे. त्यांना आम आदमी पक्षाकडून प्रचंड अपेक्षा आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत जनता आम आदमी पार्टीलाच पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय

दरम्यान, विसावदर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी, गुजरातमधील दुसऱ्या जागेवर विजय मिळवला आहे. कडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राजेंद्रकुमार चावडा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई चावडा यांचा तब्बल ३९ हजार मताधिक्याने पराभव केला आहे. तर, केरळमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीचे उमेदवार आर्यदान शौकत यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी सीपीएमचे उमेदवार एस स्वराज यांना पराभूत केलं आहे. गुजरामध्ये विधानसभेच्या १८२ जागा असून त्यातील १६१ जागांवर भाजपाचे वर्चस्व आहे. तर, काँग्रेसकडे १२, आम आदमी पार्टीकडे चार आणि समाजवादी पक्षाकडे एका आमदाराचे संख्याबळ आहे.