नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये झालेल्या पराभवामागची कारणे जाणून घेण्यासाठी भाजपाने नियुक्त केलेले निरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी येथे येत असून पक्षाचे दुसरे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही त्यादिवशी शहरात येत आहेत.

भाजपाच्या प्रदेश कार्यालयात गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मतदारसंघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरले होते. नांदेडमधील पराभव पक्षासाठी अनपेक्षित आणि धक्कादायकही ठरला. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करून आपली सारी शक्ती पक्षाच्या विजयासाठी लावली, तरी प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्यामुळे त्यानंतर पक्षात अवकळा पसरली आहे.

हेही वाचा… तब्बल २४ वर्षं मुख्यमंत्रिपद भूषवलेले नवीन पटनाईक कशी बजावणार विरोधी पक्षनेत्याची भूमिका?

निरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे अद्याप आलेला नाही; पण काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता विखे पाटील शनिवारी नांदेडला येत असल्याचे स्पष्ट झाले. निरीक्षक नांदेडमध्ये येण्यापूर्वी पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मतदारसंघातील वेगवेगळ्या तालुक्यांत बैठका घेतल्या. या बैठकांच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांतून पक्षामधील बेबनाव उघड झाला. नांदेडमधील बैठकीत तर पक्षाच्या महानगराध्यक्षांवर निशाणा साधला गेला. तत्पूर्वी चिखलीकर यांनी ‘अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश’ हेही पराभवातील एक कारण असल्याचे मत व्यक्त केले होते; पण नंतर त्यांनी वार्ताहर बैठक घेऊन खुलासा केला.

निवडणूक निकालानंतर अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्यात मुंबईमध्ये संवाद झाला होता. पण चिखलीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नाराज झालेल्या चव्हाण यांनी आपल्या पाच दिवसांच्या नांदेड मुक्कामात चिखलीकर यांना टाळून भोकर मतदारसंघातल्या घटलेल्या मताधिक्याची कारणे प्रमुख कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली. या दोन नेत्यांची नांदेडमध्ये भेट झालेली नाही. त्यावरून पक्षातल्या बेबनावाची चर्चा बाहेर सुरू आहे.

हेही वाचा… “मतं दिली नाहीत म्हणून मुस्लिमांची कामं करणार नाही”; हे वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार कोण आहेत?

नांदेडमधील पराभवास अनेक बाबी कारणीभूत ठरल्या; पण पक्षाने दिलेला उमेदवार चुकीचा होता, बहुतांश भागात त्यांच्याबद्दल नाराजी होती, ही बाब निरीक्षकांसमोर स्पष्टपणे मांडली पाहिजे, असे मत पक्षाच्या एका अनुभवी नेत्याने व्यक्त केले. मुदखेड येथील एका ज्येष्ठ नेत्याने तर फडणवीस हेच नांदेडच्या पराभवाचे शिल्पकार असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पराभवानंतर रसाळी

लातूर लोकसभा मतदारसंघातही भाजपाचा पराभव झाला. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ ‘लातूर’मध्ये समाविष्ट असून पराभवानंतर भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनिमित्त येत्या २४ जून रोजी लोहा तालुक्यातील पारडी येथे स्नेहसंवाद कार्यक्रमाला जोडूनच रसाळीचे भोजन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. वरील विधानसभा मतदारसंघावर चिखलीकर गटाचा मोठा प्रभाव आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोहा-कंधारमध्ये काँग्रेस उमेदवाराने आघाडी घेत चिखलीकर व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का दिला.