Haryana Police Bharti Cancellation 2025 : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने हरियाणातील मतदारांवर घोषणांचा पाऊस पाडला. राज्यातील बेरोजगारीच्या मुद्द्याला हाताशी धरून भाजपाने राज्य पोलीस दलातील तब्बल पाच हजार ६६६ रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर केली. त्याचवेळी ग्रुप सी पदाच्या तीन हजार ५३ जागांसाठीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याशिवाय राज्यातील विविध विभागांमध्ये २५ हजार कंत्राटी पदांची भरती प्रक्रियाही सुरू करण्यात आली. मात्र, राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर भाजपाने ही भरतीप्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हरियाणातील तरुण आक्रमक झाले आहेत.

हरियाणाच्या राजकारणात बेरोजगारीचा प्रश्न हा कायमच एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. राज्यातील तरुणवर्गामध्ये सरकारी नोकऱ्यांची मोठी मागणी असतानाच भाजपाने पोलिस दलातील पाच हजार रिक्त जागा, ग्रुप सी पदांच्या तीन हजार जागा आणि कंत्राटी पद्धतीने २५ हजार रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर केली होती. विशेष बाब म्हणजे, हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भरती जाहीर झाल्यामुळे ती राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली होती. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मिटेल या आशेने हरियाणातील जनतेने निवडणुकीवेळी भाजपाच्या पारड्यात भरभरून मते टाकली.

हरियाणात भाजपाला मिळालं होतं बहुमत

ऑक्टोबर २०२४ मध्ये भाजपाने हरियाणात ९० पैकी तब्बल ४८ जागांवर ऐतिहासिक विजय मिळविला आणि सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केली. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या २५ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊन शपथ घेतली. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर साधारण १० महिन्यांनंतर मागील आठवड्यात भाजपाने पोलीस दलातील पाच हजार व ग्रुप सी अंतर्गत तीन हजार पदांसाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे हरियाणातील तरुण आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

आणखी वाचा : बारामतीचे सत्ताकेंद्र कोण राखणार? शरद पवार विरुद्ध अजित पवार लढतीत कुणाचे पारडे जड?

हरियाणातील पोलीस भरती भाजपाने रद्द का केली?

  • निवडणुकीपूर्वी हरियाणात जाहीर केलेली पोलीस भरती अचानक रद्द करण्यामागे भाजपाने ठोस कारणेही सांगितली आहे.
  • भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे आणि प्रणालीबद्ध भरती सुनिश्चित करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.
  • भरतीसंदर्भात नवीन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे कारणही हरियाणातील भाजपा सरकारने सांगितलं आहे.
  • निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने जाहीर केलेली एकूण आठ हजार ७१९ सरकारी पदांची भरती रद्द केल्याने तरुणांनी संताप व्यक्त केला आहे.
  • दुसरीकडे विरोधीपक्षात असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपा सरकारवर टीकेचा भडिमार केला आहे.

काँग्रेसने आधीच व्यक्त केली होती शंका

भाजपा सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात विविध पदांची भरतीप्रक्रिया जाहीर केल्यानंतर तरुण मतदारांना गाजर दाखविण्याचा सरकारचा हा डाव तर नाहीये ना? असा प्रश्न त्यावेळी विरोधकांनी उपस्थित केला होता. मात्र, अनेक तरुणांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केल्याने विरोधात असलेल्या काँग्रेसने याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. तरीही या घोषणांमुळे भाजपला निवडणूकपूर्व राजकीय फायदा होईल, अशी टीका विरोधकांकडून होत होती. शेवटी विरोधकांच्या मनात जी शंका होती, तीच खरी ठरली. भाजपाने राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर अवघ्या १० महिन्यांतच भरतीप्रक्रिया रद्द केली.

BJP government has cancelled police recruitment 2025 (PTI Photo)
हरियाणातील भाजपाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी (पीटीआय फोटो)

काँग्रेसची भाजपावर सडकून टीका

भरतीप्रक्रिया अचानकपणे रद्द केल्यानंतर विरोधकांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या निर्णयाला “मतांसाठी तरुणांची फसवणूक” असे संबोधले असून, भाजपाने निवडणुकीपूर्वी भरतीची घोषणा करून तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “निवडणुकीपूर्वी हजारोंना नोकरीच्या आशा दाखवण्यात आल्या, पण सत्तेत आल्यानंतर सरकारने त्यांच्यावरच विश्वासघात केला,” अशी टीका काँग्रेसने भाजपावर केली आहे. दरम्यान, भाजपा सरकारच्या या यूटर्नमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांची सरकारवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा भाजपावर टीका करताना म्हणाले, “ऑक्टोबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने फक्त मतांसाठी सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली होती. निवडणूक आयोगाची अधिसूचना येण्याच्या काहीच दिवसआधी ही घोषणा केली गेली आणि त्यातून त्यांना विजय मिळवता आला. मात्र, भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर ही पदे भरलीच गेली नाहीत आणि आता ती रद्द केली आहेत. सत्ताधाऱ्यांनी केलेली ही फसवणूक हरियाणाच्या तरुणांच्या लक्षात आली आहे आणि वेळ आल्यावर ते याचे उत्तर नक्कीच देतील”

हरियाणाच्या हिसारमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. हा मुद्दा उपस्थित करत, हुड्डा म्हणाले, “भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले एकही वचन आजतागायत पूर्ण केलेले नाही. हिसारमध्ये काय सुरू आहे? विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शिष्यवृत्तीत कपात न करण्याची मागणी करताना त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय. हे सरकार अपयशी आणि निष्क्रिय आहे.”

सुरजेवाला म्हणतात – भाजपा सरकार खोटारडे

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि खासदार रणदीप सुरजेवाला यांनीही भाजपाला लक्ष्य केलंय. “एक म्हण आहे की सर्व लोकांना कायम फसवता येत नाही. पण नायब सिंग सैनी यांनी ही म्हण खोटी ठरवली आहे. ऑक्टोबर २०२४ निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ८,५०० हून अधिक पदांची भरती आता रद्द करण्यात आली आहे. भाजपाचे हे सरकार खोटारडे असून तरुणांची दिशाभूल करणारे आहे.”

हेही वाचा : मंत्रिमंडळातून हकालपट्टी होताच भाजपा आमदाराने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; गोवा विधानसभेत नेमकं काय घडलं?

२०१९ मधील सामाजिक-आर्थिक निकषांवर आधारित अतिरिक्त गुण देणाऱ्या अधिसूचनेवर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देताना सुरजेवाला म्हणाले, “जवळपास १३ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नाव नोंदवले होते. गेल्या पाच वर्षांत केवळ एकदाच सीईटीची परीक्षा झाली आणि त्याचे निकालही न्यायालयाने रद्द केले. तरुणांना सांगितले गेले की सामाजिक-आर्थिक निकषांवर १० अतिरिक्त गुण मिळतील, पण ती आश्वासनेही आता खोटी ठरली. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की ते आता हे प्रकरण उच्च न्यायालयात नेणार आहेत. परंतु, ही राज्यातील तरुणांची फसवणूक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणांचा रोष भाजपा कसं शांत करणार?

दरम्यान, भरतीप्रक्रिया रद्द केल्यामुळे हरियाणातील भाजपा सरकार कोंडीत सापडलं आहे. राजकीय पटलावरील या वादामुळे राज्यातील तरुण मतदारांचा रोष भाजपाविरोधात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपा या परिस्थितीला तोंड देऊन तरुणांचा रोष शांत करण्यासाठी पुन्हा भरतीप्रक्रिया जाहीर करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.