Top 5 Political Breaking News Today : आज दिवसभरात महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी सांगली जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. अहिल्यानगरमध्ये महापालिका निवडणुकीआधी महायुतीत शिंदे गट एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले. मतदार याद्यांमधील दुबार नावांवरून मनसे आणि भाजपामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. नोट चोरी बंद झाल्याने विरोधकांना व्होट चोरीची आठवण झाली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

भाजपामध्ये उफाळली गटबाजी

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले असून पदाधिकारी आणि नेत्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीआधी सांगली जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी वाटप करताना नव्याने पक्षात आलेल्यांचाही विचार केला जाणार असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित करत सांगलीतील काही आमदारांनी आपण आग्रही राहू अशी जाहीर भूमिका घेतली आहे. सांगली व मिरज हे भाजपाचे गड मानले जातात. गेल्यावेळी महापालिकेबरोबरच जिल्हा परिषदेतही भाजपाने सत्ता मिळवली होती. मात्र या गडातच भाजपामध्ये एकमेकांना शह-काटशह देण्याचे राजकारण पडद्याआड शिजत असल्याचे सांगितले जात आहे. पालकमंत्री पाटील यांच्या तोंडी आश्वासने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप एका आमदाराने केला आहे.

आणखी वाचा : “पप्पू, टप्पू आणि अप्पू… महाआघाडीची तीन माकडं,” योगी आदित्यनाथ यांनी कोणकोणत्या नेत्यांना केलं लक्ष्य?

महायुतीत शिंदे गट एकाकी?

महापालिका निवडणुकीआधी अहिल्यानगर शहरात शिंदे गट एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जशी एकमेकांशी नाळ जुळली तशी शिंदे गटाचे या दोन्ही पक्षांबरोबर जुळत नसल्याचे सांगितले जात आहे. भाजपाचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी नुकतीच केलेली काही वक्तव्ये या संभ्रमावस्थेत भर टाकणारी आहेत. केवळ महापालिकाच नाही तर जिल्ह्यातील बारा नगरपंचायती व नगरपरिषदांमध्येही कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. शहरात विखे व जगताप यांचे बहुसंख्य कार्यक्रम एकत्रित होतात. या कार्यक्रमात शिंदे गट फारसा सहभागी होताना दिसत नाही. विखे गटाशी संलग्न असलेले शिंदे गटातील काही अपवादात्मक पदाधिकारीच सहभागी असतात. मी अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या समन्वयाने काम करतो. माझा शिंदे गटाशी काहीच संपर्क नाही, असे वक्तव्य सुजय विखे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटाशी निर्माण झालेल्या दरीकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मनसे आणि भाजपामध्ये जुंपली

भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या दुबार मतदारांचे आरोप खोडून काढले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकाही केली. राज यांनी ज्या मतदार याद्या दाखवल्या त्यातील बरेच मतदार हिंदूच होते, असे शेलार यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. “आशिष शेलार यांची बुद्धी चांगली होती, पण आता का गंज लागला मला माहिती नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल, असा टोला देशपांडे यांनी लगावला. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलं मंत्रीपद दिलं नाही, कदाचित त्यामुळे असेल, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका

नोट चोरी बंद झाल्याने विरोधकांना व्होट चोरीची आठवण झाली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसतो आहे. या निवडणुकीत आपण जिंकू शकत नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. “मतदार याद्यांमध्ये चुका नसल्याचे आम्ही कधीच नाकारले नाही. उलट त्यातील चुका आम्हीही अनेकदा दाखवून दिल्या आहेत. मतदार यादीत ज्या मतदारांचे नाव दुबार आहे. त्यांनी दोन ठिकाणी मतदान केले आहे का हे विरोधकांनी दाखवून द्यावे. आमच्याकडे त्यांनी (विरोधक) जिंकलेल्या मतदारसंघातील माहिती असून ती समोर आणली तर विरोधकांना उत्तर देता येणार नाही”, असा इशाराही फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.

हेही वाचा : …तर बांगलादेशलाही भारतात विलीन व्हावेसे वाटेल; खासदाराच्या दाव्याने भाजपाची कोंडी?

असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद रद्द

प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदाराने केली होती. १९ मार्च २०२४ रोजी तक्रारदाराने सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली, पण त्यांनी ती नाकारली. असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. आता त्यांची सनद रद्द झाल्याने त्यांना न्यायालयात यु्क्तिवाद करता येणार नाही.