BJP Former Mla Suresh Rathore Second Marriage : अभिनेत्रीबरोबर गुपचूप लग्न उरकून नंतर पत्रकारपरिषदेतून त्याची जाहीर घोषणा करणारे भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राठौर यांनी समान नागरी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्षांनी त्यांना तातडीने नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत या नोटीसीला उत्तर द्या अन्यथा, कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही भाजपा पक्षश्रेष्ठींनी माजी आमदाराला दिला आहे. दरम्यान, काँग्रेसने राठौर यांच्यावर काय आरोप केले? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी त्यांना नोटीस का बजावली? हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? याबाबत जाणून घेऊ…

उत्तराखंडमधील भाजपाचे माजी आमदार सुरेश राठौर यांनी १५ जून रोजी सहारनपूर येथे जाहीर पत्रकारपरिषद घेतली. अभिनेत्री उर्मिला सनावर यांच्याबरोबर आपण पारंपारिक पद्धतीने विवाह अडकलो असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेतून जाहीर केले. विशेष बाब म्हणजे, यावेळी त्यांच्याबरोबर अभिनेत्री उर्मिला सनावर यादेखील होत्या. भाजपाच्या माजी आमदाराने अभिनेत्रीबरोबर लग्नगाठ बांधल्याचे कळताच राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

त्यामागचं कारण म्हणजे, सुरेश राठौर आणि उर्मिला सनावर हे दोघेही आधीच विवाहित होते. काँग्रेसने याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपाला लक्ष्य केलं. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करणाऱ्या भाजपाच्याच माजी आमदारानेच या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच राठौर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

भाजपाने बजावली राठौर यांना नोटीस

उत्तराखंडमधील समान नागरी कायद्यातील कलमं लक्षात घेता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेश भट्ट यांनी माजी आमदार सुरेश राठौर यांना तातडीने नोटीस बजावली आहे. भाजपाचे राज्य सरचिटणीस राजेंद्र बिष्ट यांनी राठौर यांना सात दिवसांची मुदत देऊन यावर स्पष्टीकरण मागितले आहे. “माजी आमदाराचे वर्तन पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. राठौर यांनी नोटीसीला उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं राजेंद्र बिष्ट यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

आणखी वाचा : Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार? ‘आप’च्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

सुरेश राठौर कायदेशीर बाबीत अडकणार?

  • २७ जानेवारी २०२५ पासून उत्तराखंड सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू केला आहे.
  • हा कायदा बहुविवाह म्हणजे एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर देखील बंदी घालतो.
  • या कायद्यानुसार, धार्मिक रीती-रिवाजांनी किंवा कायदेशीर तरतुदीनुसार विवाह करता येतो.
  • त्यामुळे भाजपा नेते सुरेश राठौर यांचा दुसरा विवाह कायदेशीर चौकशीत येण्याची शक्यता आहे.
  • त्यामागचं कारण म्हणजे, सुरेश राठौर हे आधीच विवाहित असून त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही.
  • त्याचबरोबर अभिनेत्री उर्मिला सनावर यादेखील विवाहित असून त्यांनीही पतीला घटस्फोट न देता दुसऱ्यांदा विवाहगाठ बांधली आहे.
BJP Former Mla Suresh Rathore Second Marriage
भाजपाचे माजी आमदार सुरेश राठौर यांनी अभिनेत्री उर्मिला सनावर यांच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली (छायाचित्र सोशल मीडिया)

अभिनेत्रीने राठौर यांच्यावर केले होते गंभीर आरोप

विशेष बाब म्हणजे, दीड वर्षांपूर्वी अभिनेत्री उर्मिला सनावर यांनी भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुरेश यांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून माझ्याशी शरीरसंबंध ठेवले आणि त्यानंतर नेपाळला नेऊन गंधर्व विवाह केला. मात्र, लग्नानंतर ते माझ्यापासून दूर गेले आणि मी एकटी पडले, असं अभिनेत्रीने म्हटलं होतं. या आरोपांनंतर उर्मिला यांनी दोघांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यात काही खाजगी फोटोंचाही समावेश होता. त्याचबरोबर अभिनेत्री राठौर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोपही केला होता. माझ्या घरात काही अज्ञात महिला शिरल्या आणि त्यांनी मला धक्काबुक्की केली, असंही अभिनेत्रीने म्हटलं होतं.

सुरेश राठौर यांनी फेटाळले होते आरोप

अभिनेत्री उर्मिला सनावर यांनी केलेले सर्व आरोप भाजपाचे माजी आमदार सुरेश राठौर यांनी फेटाळून लावले होते. तसेच त्यांनी अभिनेत्रीविरोधात ब्लॅकमेलिंग आणि बदनामीची तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे हे प्रेमप्रकरण चांगलेच चर्चेत होते. मात्र, काही महिन्यांनंतर दोघेही प्रसारमाध्यमांसमोर आले आणि त्यांनी वाद मिटल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलासेही केले. या पत्रकार परिषदेत राठौर म्हणाले की, उर्मिलावरील माझे अजूनही तितकेच प्रेम आहे आणि मी तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवू इच्छितो. आम्ही दोघांनीही पारंपारिक पद्धतीने लग्न केले असल्याचे राठौर यांनी जाहीर केले होते.

हेही वाचा : पोटनिवडणुकांचे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा? किती जागांवर झाला पराभव?

अभिनेत्री म्हणते – आमच्याकडून कायद्याचा भंग नाही

उर्मिला सनावर यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांचा आणि सुरेश राठौर यांचा विवाह उत्तराखंडमध्ये २७ जानेवारी २०२५ रोजी लागू झालेल्या समान नागरी संहितेच्या (UCC) आधीच झाला होता, त्यामुळे त्यांनी कोणताही कायदा भंग केलेला नाही. “काही लोक मुद्दामहून या विवाहाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते असे सांगत आहेत की, सुरेश आणि माझा विवाह १५ जून २०२५ रोजी झाला; पण ही बाब पूर्णत: खोटी आहे. कारण, २०२२ मध्येच आमचा विवाह पार पडला होता,” असं उर्मिला सनावर यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या म्हणाल्या की, उत्तराखंडमधील नेते हरीश रावत, नारायण दत्त तिवारी, दिग्विजय सिंह यांनी प्रत्येकी दोन विवाह केले असतानाही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. पण जेव्हा एका दलित महिलेचा विवाह एका दलित नेत्याशी होतो, तेव्हा त्यावर आक्षेप घेतले जातात. हे सामाजिकदृष्ट्या अयोग्य आहे. दरम्यान, भाजपातील पक्षश्रेष्ठी माजी आमदार सुरेश राठौर यांना नोटीस पाठवलेली आहे. त्यामुळे या नोटीसीला ते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.