भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे माजी सदस्य आणि पक्षाच्या आयटी सेलचे माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा हे मंगळवारी स्वतःच्या पक्षासह काँग्रेसमध्ये डेरेदाखल होत आहेत. २०१५ साली भाजपातून बाहेर पडत त्यांनी स्वतःची ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’ स्थापन केली होती. भाजपामधून बाहेर पडताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आत्मकेंद्री आणि व्यक्तिकेंद्रित कार्यशैलीवर टीका केली होती.

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी आपल्या निर्णयाबाबत बोलत असताना प्रद्युत म्हणाले, “माझ्या पक्षासह काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. आता भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची वेळ आली आहे. भाजपा सध्या सर्वच यंत्रणांवर वरचढ झाला असून त्याला आव्हान देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या राष्ट्रपित्यांनी जो ‘आयडिया ऑफ इंडिया’चा विचार मांडला होता, तो वाचविण्याची आता गरज निर्माण झाली आहे. काँग्रेसमधील बहुसंख्य नेत्यांना असे वाटते की, ही एक मोठी लढाई आहे. जी मोठ्या व्यासपीठावरून लढली गेली पाहिजे.”

जेव्हा एलडीपीची स्थापना केली गेली तेव्हा आमचा विरोध भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना होता. मात्र गेल्या काही महिन्यांत नऊ भाजपाविरोधी पक्षांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. त्यांपैकी प्रद्युत बोरा यांचा पक्ष एक आहे. मागच्या महिन्यात आसाममध्ये झालेल्या बैठकीत भाजपाविरोधात विरोधकांची एकजूट करणे आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रद्युत बोरा पुढे म्हणाले की, आम्ही पक्ष स्थापन केला तेव्हा सर्वच (काँग्रेसच्याही) पक्षांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला आता आठ वर्षे झाली आहेत. आता वैयक्तिक गोष्टी बाजूला सारत एका मोठ्या उद्देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही राजकीय वास्तव स्वीकारून काँग्रेससोबत हातमिळवणी करत आहोत.

एलडीपीची स्थापना केल्यानंतर बोरा यांनी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत १४ जागी निवडणूक लढविली होती. पण एकाही जागी त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यानंतर २०२१ ची निवडणूक त्यांनी लढवली नाही.