पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शाझिया इल्मी या आपल्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी टीव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत मुस्लीम समुदायाला संदेश देत मौलानांची भूमिका, फुटीरतावादी राजकारण, विरोधकांची भूमिका यांसारख्या विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. त्यांनी युरोपियन संसदेतील त्यांच्या भाषणाचाही उल्लेख केला. भाजपा सरकारमुळे मुस्लीम समाजाची कशी प्रगती झाली? याविषयीही त्या बोलल्या. त्या नक्की काय म्हणाल्या जाणून घेऊयात…
“मोदींच्या योजनांचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांना”
- शाझिया इल्मी म्हणाल्या, ११ वर्षांपूर्वी देशात कॉंग्रेस सरकार होती. आकडेवारी पाहिल्यास भाजपाच्या योजनांचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांना झाला, कारण मुस्लीम समाज गरीब होता. मुस्लीम समाज गरीब का राहिला याचे उत्तर कॉंग्रेस, सपा, आम आदमी पार्टी,आरजेडीने द्यावे असे त्या म्हणाल्या.
- भाजपाच्या योजनांचा ३० ते ३५ टक्के लाभ मुस्लिमांना झाला, असा दावा त्यांनी केला.
- त्या पुढे म्हणाल्या, “मुस्लिमांच्या बाजूने बोलणारे पक्षच मुस्लीमविरोधी, कारण मुस्लिमांनी पुढे जावे, असे त्यांना वाटत नाही. मुस्लीम महिला म्हणून भाजपाशिवाय दुसरा पक्ष नाही, जिथे माझ्यासारखी महिला या मुद्द्यांवर परखडपणे बोलू शकेल.”

भाजपावर मुस्लिमविरोधी असल्याचे आरोप का केले जातात?
“भाजपा मुस्लीम विरोधी असल्याचे सांगत विरोधक मत मागत आले आहेत. तेच भाजपाला मुस्लीम विरोधी दाखवतात, कारण मुस्लीम विरोधी दाखवल्याने त्यांना मुस्लीम मतं देतील. या नेत्यांनी मुस्लिमांनाही तसे पटवून दिले आहे. अमीर खाननेसुद्धा हे म्हटले होते की मोदी सत्तेत आल्यास आम्ही देश सोडू. मोदीजी सत्तेत आले आणि मुस्लिमांचा केवळ फायदा झाला,” असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “कोणताही मुख्यमंत्री, जिल्हा अधिकारी, तहसीलदार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, क्लार्क अशा कोणीही मोदींच्या कार्यकाळात धर्माच्या आधारावर मुस्लिमांची फसवणूक केली नाही. “
रस्त्यांची मुस्लीम नावे बदलण्याबाबत त्या काय म्हणाल्या?
शाझिया इल्मी म्हणाल्या, “आक्रमण करणाऱ्या, निर्दयी व्यक्तीच्या नावावर कोणता रस्ता किंवा स्मारक असावे का? मला हे फार विचित्र वाटते. बॉम्बेसुद्धा मुंबादेवीच्या नावावरून मुंबई झाले. हा बदल भाजपाने केला नाही, परंतु तसे व्हावे हे लोकांना वाटले.” रस्त्यांची नावे भाजपाच्याच काळात नव्हे तर कॉंग्रेसच्या काळातदेखील बदलल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा प्रवेशाच्या निर्णयावर त्या काय म्हणाल्या?
शाझिया इल्मी म्हणाल्या, “माझ्यावर आशीर्वाद होते. आम आदमी पार्टीला जेव्हा प्रत्यक्षात पार्टी म्हणून ओळख मिळू लागली होती तेव्हा मी पक्ष सोडला, कारण मला अनेक अशा गोष्टी १० वर्षांपूर्वी माहिती पडल्या ज्या लोकांना आता माहिती होत आहेत. लोक म्हणायचे की, तुम्ही पक्षात असता तर आज मंत्री असत्या, पण मी त्यांना म्हणते की मी पक्षात असते तर तुरुंगात असते. मला तुरुंगात जायचे नव्हते आणि भ्रष्टाचारदेखील करायचा नव्हता.”
शाझिया इल्मी कोण आहेत?
कानपूरमधील एका मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबातून आलेल्या शाझिया यांचे लग्न साजिद मलिक यांच्याशी झाले आहे. ते अर्धे गुजराती मुस्लीम आणि अर्धे तमिळ अय्यर आहेत. ते गुंतवणूक बँकर आणि उद्योजक असून दिल्लीत राहतात. त्यांचे दीर आरिफ मोहम्मद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी राजकारणी आणि मंत्री होते आणि सध्या बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) सदस्य आहेत. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत शाझिया यांनी स्टार न्यूजवर अँकरिंग आणि अनेक मुद्द्यांवर आधारित टीव्ही शोचे प्रॉडक्शन केले. त्यांनी झी न्यूज आणि टाइम्स ऑफ इंडिया यांसारख्या प्रसिद्ध मीडिया संस्थांमध्येही काम केले आहे.
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’(आयएसी) या आंदोलनादरम्यान त्या प्रकाशझोतात आल्या. त्या आयएसी गटाच्या कोअर कमिटी सदस्य होत्या. त्या टीम अण्णा हजारेच्या मीडिया स्ट्रॅटेजिस्ट होत्या. त्या आम आदमी पार्टी (आप) च्या संस्थापक सदस्यांपैकी राहिल्या आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये, त्यांनी आरके पूरम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश आले नाही. त्यावेळी एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात शाझिया आणि आप नेते कुमार विश्वास पक्षासाठी काही मदत म्हणून पैसे स्वीकारताना दिसले, यामुळे संतापून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, परंतु पक्षाच्या नेतृत्वाने तो स्वीकारला नाही. त्या दुसऱ्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये मुस्लिमांनी धर्मनिरपेक्ष असण्याऐवजी अधिक सांप्रदायिक असावे असे म्हणताना दिसल्या. त्यांच्या या कथित सांप्रदायिक टिप्पणीमुळे राजकीय विरोधकांकडून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात रायबरेलीतून उभे करायचे होते, परंतु त्यांनी नकार दिला. दिल्लीतून निवडणूक लढवण्याची त्यांची मागणी फेटाळून पक्षाने अखेर त्यांना गाझियाबादमधून उभे केले. दुर्दैवाने, त्यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी ‘आप’चा राजीनामा दिला. त्यांनी केजरीवाल यांच्यावर त्यांच्या जवळच्या लोकांना प्रोत्साहन देण्याचा आरोपही केला. २०१५ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.