BJP Defeat Four State Assembly Bypolls : गुजरातसह चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दोन जागांवर विजय मिळविला. तर भाजपा, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यश मिळालं. विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. गुजरातमधील विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराने भाजपा उमेदवाराचा तब्बल १७ हजार मताधिक्याने पराभव केला. दरम्यान, या पोटनिवडणुकीत कोणकोणत्या मतदारसंघात भाजपाला पराभवाचा धक्का बसला, ते जाणून घेऊ…

पश्चिम बंगालमधील कालीगंज, पंजाबमधील लुधियाना पश्चिम, गुजरातमधील विसावदर आणि केरळमधील निलांबूर या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (तारीख १९ जून) मतदान घेण्यात आलं होतं. त्यानंतर आज, सोमवारी या पाचही जागांवरील मतमोजणी पार पडली. भाजपाने या पोटनिवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावून दिली होती. दुसरीकडे दिल्लीमधील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही पोटनिवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी आक्रमकपणे प्रचार केला होता.

आम आदमी पार्टीचा कोणकोणत्या जागांवर विजय?

राजधानी दिल्लीवर सलग १० वर्ष सत्ता गाजविल्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राजधानीतील सत्तेतून दूर व्हावं लागलं. त्यानंतर, गुजरात आणि पंजाबमधील पोटनिवडणुकीत आपला मोठं यश मिळालं आहे. गुजरातमधील विसावदर आणि पंजाबमधील लुधियाना मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विसावदरमध्ये आपचे उमेदवार गोपाल इटालिया तब्बल १७ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांनी जवळपास १२ हजार मताधिक्यांनी विजय मिळविला आहे.

आणखी वाचा : BJP Defeat in Gujarat : आमदार फुटल्यानंतरही ‘आप’ने गुजरातमध्ये भाजपाला हरवलं; पोटनिवडणुकीत नेमकं काय घडलं?

भाजपाचा किती जागांवर झाला पराभव?

  • गुजरातच्या विसावदर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार किरीट पटेल पराभूत झाले आहेत. इथे आम आदमी पार्टीला विजय मिळाला आहे.
  • पश्चिम बंगालमधील कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार आशिष घोष पराभूत झाले आहेत. या जागेवर तृणमूलने ४९ हजार मतांनी विजय मिळविला आहे.
  • पंजाबच्या लुधियाना मतदारसंघात भाजपा उमेदवार जीवन गुप्ता यांचा दारुण पराभव झाला आहे, या जागेवर आम आदमी पार्टीचे संजीव अरोरा विजयी झाले आहेत.
  • केरळमधील निलांबूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार मोहन जॉर्ज यांचा पराभव झाला. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आर्यदान शौकत यांचा विजय झाला.
  • गुजरातमधील कडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राजेंद्रकुमार चावडा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई चावडा यांना पराभूत केलंय.
aam aadmi party win in punjab assembly bypoll election (PTI Photo)
पंजाबच्या लुधियाना विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचा विजय झाला (छायाचित्र पीटीआय)

गुजरातमध्ये भाजपाचा पराभव कशामुळे झाला?

गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार किरीट पटेल यांचा तब्बल १७ हजार मताधिक्याने पराभव झाला. या जागेवर आम आदमी पार्टीचे उमेदवार गोपाल इटालिया विजयी झाले. विशेष बाब म्हणजे, २०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत विसावदर मतदारसंघात आपच्याच उमेदवाराचा विजय झाला होता. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्याने या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीसाठी भाजपाने लवकर उमेदवारी जाहीर न केल्यामुळेच किरीट पटेल यांचा पराभव झाला असल्याचं सांगितलं जात आहे. तर, आम आदमी पक्षाने पंजाबचा फॉर्म्युला वापरून निवडणूक जाहीर होण्याआधीच गोपाल इटालिया यांची उमेदवारी जाहीर केली होती. ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यामुळे किरीट पटेल यांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले, परिणामी ते पिछाडीवर दिसून आले होते.

हेही वाचा : BJP MLAs Suspended : भाजपाच्या ४ आमदारांचं तडकाफडकी निलंबन; विधानसभेत नेमकं काय घडलं?

पोटनिवडणुकांचे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा?

चार राज्यांच्या पाच विधानसभा पोटनिवडणुकीत चार जागांवर पराभव झाल्यामुळे भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. आगामी काळात बिहार, पश्चिम बंगाल, केरळ व गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. मात्र, त्याआधी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यामुळे विरोधीपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे, तर भाजपाचे नेते मात्र चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये आपच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “पंजाबमधील जनता ‘आप’ सरकारच्या कामावर खूप खूश आहे. तर गुजरातमधील जनता आता भाजपाला कंटाळली आहे. त्यांना आम आदमी पक्षाकडून प्रचंड अपेक्षा आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत जनता आम आदमी पार्टीलाच पाठिंबा देईल,” असा विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठं यश

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना केरळमध्ये मोठं यश मिळालं आहे. वायनाडमधून खासदार झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील निलांबूर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाला आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या उमेदवारासाठी प्रियांका गांधी स्वत: प्रचाराच्या मैदानात उतरल्या होत्या. मुख्यमंत्री विजयन यांच्यासोबत वाद झाल्याने डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर विजयी झालेले अपक्ष आमदार पी. व्ही अन्वर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आर्यदान शौकत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला असून अन्वर यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे भाजपाचे उमेदवार मोहन जॉर्ज हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.