नाशिक – शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिकांचा विरोध धुडकावत अखेर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीत बडगुजर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी आरोपांची राळ उडवली होती. अवघ्या काही महिन्यांत त्यांचे पक्षात स्वागत झाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असली तरी यानिमित्ताने भाजपने बेरजेचे राजकारण करुन ठाकरे गटाबरोबर शिंदे गटालाही शह दिल्याचे मानले जाते.

शिवसेना दुभंगल्यापासून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. शिंदे गटाची वाढती ताकद महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यात अडचणीची ठरू शकते. बडगुजरांना प्रवेश देताना याचा विचार झाला असेल. यानिमित्ताने ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कारण, ज्या दिवशी बडगुजर हे काही माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये गेेले, त्याच दिवशी शिंदे गटाने ठाकरे गटाच्या चार माजी नगरसेवकांच्या हाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण दिले.

कधीकाळी महापालिकेत ठेकेदार म्हणून वावरणारे बडगुजर यांनी राजकीय क्षेत्रात अल्पावधीत उत्कर्ष साधला. कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टीच्या चित्रफिती सत्ताधाऱ्यांकडून उघड झाल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. बडगुजरांविरुद्ध २९ गुन्हे दाखल असून त्यांना प्रवेश दिल्यास भाजपची प्रतिमा मलीन होईल. आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील, ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वासमोर मांडली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत बडगुजरांना पावन करून घेतल्या्ने त्यांनाही धक्का बसला.

आधीच्या पक्षात बडगुजरांना अनेक महत्वाची प्रमुख पदे मिळाली होती. मात्र त्यांचे राजकीय प्रभावक्षेत्र सिडकोतील दोन, तीन प्रभागांपलीकडे गेले नाही. विधानसभा निवडणुकीत बडगुजर हे स्वत:च्या प्रभागात पिछाडीवर होते. म्हणजे या भागातून ते भाजपला खूप मोठी ताकद देतील, अशीही स्थिती नाही. तरीदेखील प्रतिस्पर्ध्याची ताकद क्षीण करण्यात आणि पालिकेतील राजकारण, प्रभाग रचना प्रक्रियेतील त्यांच्या अभ्यासाचा पक्षाला उपयोग होण्याची शक्यता काही जण बोलून दाखवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे १२ प्रभाग असून ४७ नगरसेवक आहेत. मावळत्या महापालिकेत भाजपचे २२ नगरसेवक होते. मधल्या काळात इतर पक्षातील काही माजी नगरसेवक भाजपमध्ये आले. विधानसभा निवडणुकीत ज्या बडगुजरांना मतदारांनी झिडकारले, त्यांना भाजप आता महापालिका निवडणुकीत पुढे करणार आहे. मतदारांना ते कितपत रुचेल, याचे उत्तर निकालातून मिळेल.