नांदेड: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता भाजपासोबत असला, तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या पुढील वर्षाच्या उत्तरार्धात होणार्या निवडणुकीमध्ये या पक्षाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करून ‘भाकरी फिरवण्याची तयारी’ भाजपाने आतापासूनच सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीसपदी असलेले सतीश भानुदासराव चव्हाण हे वरील मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेमध्ये आहेत. २०२० साली झालेल्या मागील निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या शिरीष भास्करराव बोराळकर यांचा पराभव करून परिषदेतील आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला.
२०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक मोठा गट तेव्हाच्या युती सरकारमध्ये सहभागी झाला. या फाटाफुटीत आ.चव्हाण यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाला पसंती दिली होती. पण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी थोरल्या पवारांच्या ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करून गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या प्रशांत बंब यांना आव्हान दिले. निवडणुकीत त्यांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव झाल्यानंतर पुढील राजकीय वाटचाल सुकर व्हावी यासाठी ते पुन्हा अजित पवारांच्या पक्षामध्ये परतले.
वरील मतदारसंघात आ.चव्हाण यांचा उदय होण्याआधी भाजपाकडून आधी जयसिंगराव गायकवाड आणि मग श्रीकांत जोशी यांनी प्रतिनिधित्व केले; पण जोशी यांच्या एका यशानंतर भाजपाला हा मतदारसंघ जिंकता आला नाही. निवडणुकीसाठी सुमारे वर्षभराचा कालावधी असला, तरी १ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या मतदार नोंदणी प्रक्रियेच्या अनुषंगाने भाजपाने या मतदारसंघासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगरात शनिवारी झालेल्या विभागीय बैठकीस नांदेडमधून खा.डॉ.अजित गोपछडे, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, ग्रामीणचे दोन जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे व किशोर देशमुख, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, विविध आघाड्यांचे प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते वरील बैठकीमध्ये सहभागी झाले होेते. परभणी जिल्ह्यातून राज्यमंत्री मेघना बोर्डीकरही बैठकीमध्ये होत्या.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि आमदार चव्हाण यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. तसेच काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आजी-माजी आमदार, वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांशी संबंधित असलेले प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मागील दीड-दोन वर्षांत भाजपामध्ये आल्यामुळे या मतदारसंघात भाजपासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे मानले जाते. सतीश चव्हाण यांना विधान परिषदेतून हद्दपार करण्याचा भाजपाचा इरादा दिसत असला, तरी तूर्त जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्याकडे भाजपाचा कल राहणार आहे.
सतीश चव्हाण यांनी मागील काळामध्ये जिंकलेल्या निवडणुकांमध्ये नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांतील काँग्रेस नेते, त्यांच्याशी संबंधित संस्थांमधील प्राध्यापक-कार्यकर्ते यांचा मोठा हातभार लागला होता. आता हा सारा समूह भाजपामध्ये आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची थोरले आणि धाकटे पवार यांच्यामध्ये विभागणी झाल्यामुळे थोरल्या पवारांना मानणारे नेते, कार्यकर्ते यांना सतीश चव्हाणांबद्दल पूर्वीसारखी आस्था राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा पक्ष महायुतीत असला, तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा युतीधर्मानुसार या पक्षाला सोडली जाण्याची शक्यता नसल्याचे भाजपाच्या एका पदाधिकार्याने शनिवारच्या बैठकीदरम्यान सांगितले.
वरील मतदारसंघात भाजपाकडून कोणाला उमेदवारी द्यायची, हा विषय तूर्त चर्चेमध्ये नाही. मतदार नोंदणीसाठी निर्धारित केलेल्या कालावधीत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे नियोजन भाजपाकडून सुरू झाले आहे. शनिवारी मराठवाड्याच्या बहुतांश भागात पाऊस आणि पूरस्थिती होती; पण भाजपाने आपली नियोजित बैठक रद्द न करता विभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगरात एकत्र आणले होते.
आ.सतीश चव्हाण नुकतेच नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे सांत्त्वपनपर भेटीसाठी आले होते. या भेटीदरम्यान पदवीधरच्या आगामी निवडणुकीचा विषय निघाला, तेव्हा भाजपा आपला उमेदवार स्वतंत्रपणे उभा करण्याच्या तयारीत असल्याचे खुद्द चव्हाण यांनीच मान्य केले. त्यांच्या निकटवतीर्यांचा अंदाजही तसाच आहे.